जळगाव - सोन्यासाठी प्रसिद्ध असलेल्या जळगावात आज सोन्याच्या दराने उच्चांक गाठला. आज सकाळी सराफ बाजार सुरू झाला तेव्हा प्रति तोळा(10 ग्रॅम) 51 हजार 500 रुपये इतका दर सोन्याला मिळाला. येत्या आठवडाभरात सोन्याचे 53 हजार रुपये प्रति तोळा असतील, असा अंदाज सराफ व्यावसायिकांनी वर्तवला आहे. जागतिक पातळीवर घडणाऱ्या घडामोडींमुळे सोने-चांदीचे भाव वाढत आहेत.
कोरोना लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर सराफ बाजारातील उलाढाल ठप्प झाली होती. परंतु कमोडिटी मार्केटमध्ये उलाढाल सुरू असल्याने सोन्याचे भाव उच्चांकी पातळीवर पोहचले. आता लॉकडाऊनमध्ये काही अंशी शिथिलता देण्यात आल्यानंतर सराफ बाजार हळूहळू पूर्वपदावर येत आहे. असे असले तरी कमोडिटी मार्केटमध्ये असलेले उच्चांकी भाव आता प्रत्यक्ष बाजार सुरू झाल्यानंतरही कायम आहेत. अशीच परिस्थिती कायम राहिली तर सोन्याचे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. लग्नसमारंभ देखील काही प्रमाणात सुरू झाल्याने सोने-चांदी खरेदीकडे नागरिकांचा कल वाढला आहे.