जळगाव -सोने-चांदीच्या व्यापारामुळे जळगाव शहराची ओळख संपूर्ण देशभर 'सुवर्णनगरी' म्हणून आहे. परंतु, कोरोनामुळे याच सुवर्णनगरीत सध्या स्मशान शांतता आहे. आज (मंगळवारी) गुढीपाडव्याचा सण आहे. साडेतीन मूहुर्तांपैकी हा एक शुभ मूहुर्त मानला जातो. या दिवशी सोने खरेदीला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. मात्र, कोरोनामुळे सुवर्णनगरीतील सर्वच सुवर्णपेढ्या बंद असल्याने याठिकाणी एक रुपयाचीही उलाढाल होऊ शकलेली नाही. सुवर्णनगरीतील कोट्यवधी रुपयांचे व्यवहार ठप्प असून, सुवर्ण व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
गेल्या वर्षीही जळगाव शहरात एप्रिल महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला होता. शिवाय केंद्र सरकारच्या वतीने टाळेबंदी घोषित करण्यात आल्याने सुवर्णनगरीतील सराफी पेढ्या बंद होत्या. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान व्यापाऱ्यांना सहन करावे लागले होते. या वर्षी देखील गेल्या वर्षीप्रमाणेच स्थिती आहे. सलग दुसऱ्या वर्षी सराफ व्यावसायिकांना कोरोनामुळे गुढीपाडव्याच्या मूहुर्तावर आपल्या पेढ्या बंद ठेवाव्या लागल्या आहेत. जळगाव शहरात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. ही साखळी खंडित करण्यासाठी स्थानिक प्रशासनाने अत्यावश्यक सेवेतील दुकाने व आस्थापना सोडून इतर सर्व प्रकारच्या दुकाने व आस्थापनांवर कडक निर्बंध घातले आहेत. त्यात सराफ पेढ्यांचाही समावेश असल्याने सराफ बाजारातील सर्वच व्यवहार ठप्प आहेत.
सराफा बाजारातून आढावा घेतांना प्रतिनिधी काय म्हणतात सराफ व्यावसायिक? कोरोनामुळे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सराफ पेढ्या बंद आहेत. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचे आर्थिक व्यवहार थांबले आहेत, याबाबत 'ईटीव्ही भारत'शी बोलताना प्रसिद्ध आर. सी. बाफना ज्वेलर्सचे संचालक सिद्धार्थ बाफना म्हणाले की, कोरोनामुळे स्थानिक पातळीवर खबरदारी म्हणून प्रशासनाने कडक निर्बंध घातले आहेत. समाजहित म्हणून सराफ व्यापाऱ्यांनी टाळेबंदीला सहकार्य केले आहे. परंतु, कोरोनामुळे गेल्या वर्षीपासून सराफ व्यावसायिकांची स्थिती बिकट आहे. अशाही परिस्थितीत व्यापाऱ्यांना इतर खर्च सुटलेले नाहीत. प्रशासनाने आमच्यावर निर्बंध घालण्यापूर्वी थोडा वेळ किंवा नियमावलींच्या अधीन राहून सूट देण्याची गरज होती. असे झाले असते तर आम्हाला पूर्वी मिळालेल्या ऑर्डर पूर्ण करता आल्या असत्या. कोरोनामुळे लग्नसराईवरही मोठा परिणाम झाला आहे. अनेकांनी लग्न समारंभ पुढे ढकलले आहेत. लग्न समारंभाच्या निमित्ताने आलेल्या ऑर्डरही तयार आहेत. पण सराफ पेढ्याच उघडता येत नसल्याने व्यवहार होऊ शकलेले नाहीत. जर या ऑर्डर रद्द झाल्या, तर आम्हाला मोठा फटका बसू शकतो. दागिने घडवणारे कारागीर, पेढीतील कर्मचाऱ्यांचे पगार, शोरूमचा मेंटनन्स, कर्जाचे हफ्ते तसेच इतर दैनंदिन देणी कशी चुकवावी? हा मोठा प्रश्न असल्याचे सिद्धार्थ बाफना यांनी सांगितले आहे.
सुवर्ण बाजारातील कोट्यवधी रुपयांचे व्यवहार थांबले
कोरोनामुळे सुवर्ण बाजारातील कोट्यवधी रुपयांचे व्यवहार थांबले आहेत. याबाबत 'ईटीव्ही भारत'शी बोलताना जळगाव शहर सराफ असोसिएशनचे सचिव स्वरुपकुमार लुंकड यांनी सांगितले की, जळगाव जिल्ह्यात सुमारे दोन ते अडीच हजार सराफा व्यावसायिक आहेत. जळगाव शहराचा विचार केला तर एकट्या जळगावात दोनशे ते अडीचशे व्यावसायिक आहेत. कोरोनामुळे आज या सर्वच व्यावसायिकांनी आपल्या पेढ्या, शोरूम्स बंद ठेवले आहेत. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचे आर्थिक व्यवहार थांबले आहेत. जळगावातील सराफा बाजारात दररोज किमान 50 लाख ते 1 कोटी रुपयांचे आर्थिक व्यवहार होत असतात. पण आजची स्थिती विचारात घेतली तर एक रुपयाचीही उलाढाल सुरू नाही. त्यामुळे सराफा व्यापारी अक्षरशः हवालदिल झाले आहेत. कोरोनाची परिस्थिती यापुढे कशी असेल? हे निश्चित नसल्याने राज्य शासनाने टाळेबंदीबाबत काहीतरी सकारात्मक विचार करायला हवा. आज शहरात कडक निर्बंध असताना अत्यावश्यक सेवेसह इतर दुकाने सुरू आहेत. मग आम्हीही नियमावली पाळून व्यवहार करू शकतो. पण आमच्यावर जी वेळ आली आहे, ती केवळ शासनाच्या आततायीपणामुळे आली आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही, असेही स्वरुपकुमार लुंकड यांनी सांगितले आहे.
सराफा बाजारातील इतर व्यावसायिकही हवालदिल
कोरोनामुळे सराफ पेढ्या बंद असल्याने फक्त सराफा व्यापारीच नव्हे तर पोत गुंफणारे, मणी विकणारे, पायातील साखळ्या व इतर किरकोळ दागिने विकणारे छोटे-मोठे व्यावसायिकही हवालदिल झाले आहेत. सराफा बाजारात रस्त्यावर ठिकठिकाणी दुकाने मांडून व्यवसाय करणाऱ्या या व्यावसायिकांवर देखील उपासमारीची कुऱ्हाड कोसळली आहे. सराफा बाजार बंद असल्याने या व्यावसायिकांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे. सराफ बाजारात असे सुमारे दीडशे ते दोनशे व्यावसायिक आहेत. यात बहुतांश व्यावसायिक हे वयोवृद्ध आहेत. ते पूर्वजांचा वारसा पुढे चालवत आहेत. पण कोरोनामुळे त्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याच संदर्भात बोलताना पोत गुंफण्याचा व्यवसाय करणाऱ्या सईदा शेख म्हणाल्या की, पूर्वी सराफा बाजार नियमितपणे सुरू असताना ग्राहकांची वर्दळ असायची. दिवसाकाठी 300 ते 400 रुपये कमाई व्हायची. आता परिस्थिती बदलली आहे. कोरोनामुळे दुकाने थाटता येत नाहीत. त्यामुळे उदरनिर्वाह कसा करायचा? हा प्रश्न आहे. आज गुढीपाडव्याचा सण. पण सराफ बाजार बंद आहे. माझ्या आजवरच्या आयुष्यात दुसऱ्यांदा हा बाजार बंद आहे. यापूर्वी कधीही गुढीपाडव्याच्या दिवशी सराफ बाजार बंद असल्याचे मी पाहिले नाही. एरवी गुढीपाडव्याच्या दिवशी खूप काम मिळायचे. आज मात्र, कोरोनामुळे बाजार बंद आहे. कोरोनाचे संकट लवकर दूर होऊन सर्व जनजीवन पूर्वपदावर येवो, अशी अपेक्षा शेख यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केली आहे.