जळगाव:धनत्रयोदशी निमित्त सुवर्णनगरी ग्राहकांनी फुलली आहे. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. आज धनत्रयोदशी, धनत्रयोदशीला सोनं खरेदी करण्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. याच पार्श्वभूमीवर जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली आहे. 2 वर्षानंतर निर्बंध मुक्त दिवाळी साजरी होत असल्याने सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांचा देखील मोठा उत्साह पाहायला मिळत आहेत.
जळगाव सुवर्णनगरीत ग्राहकांची मोठी गर्दी गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे ३० ते ३५% वाढीचा अंदाजदिवाळीला सुरुवात झाली असून, धनत्रयोदशीला सोने खरेदीसाठी ग्राहकांना चांगली संधी मिळाली आहे. देशभरात सोन्याचे दर घटले आहे. अनेक ठिकाणी दर ५० हजार रुपये तोळ्याच्या जवळपास आहेत. यंदा देशातील जनतेचा शॉपिंगचा मूड पाहता धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी होणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे ३० ते ३५ टक्के वाढ होईल, असा अंदाज आहे.
ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सोने- चांदीचे भाव वाढण्यास सुरुवात झाली होती. पहिल्या आठवड्यातच सोन्याचे दर अडीच हजार रुपयांनी वाढले होते. तरीही दसऱ्याच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणावर उलाढाल झाली. याच काळात चांदी देखील ५७ ते ५८ हजारांच्या दरम्यान राहिली आहे. गेल्या 2 दिवसांपासून तर सोने चांदीचे भाव पुन्हा कमी कमी होऊ लागले. गेल्यावर्षी सोन्याचे दर प्रती तोळा ४७ हजार ७०० रुपयांच्या जवळपास होते.
७० टनांपर्यंत यंदा होणार विक्रीइंडिया बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, गेल्यावर्षी धनत्रयोदशीला देशभरात सुमारे ५० टन एवढे सोने विविध स्वरूपात विकण्यात आले आहे. यावर्षी हा आकडा ७० टनांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. २०१९ मध्ये सुमारे ३० टन एवढी सोन्याची विक्री झाली होती. त्यानंतर कोरोना काळात त्यात मोठी घट झाली. मात्र गेल्या 2 वर्षांपासून नागरिकांमध्ये मोठा उत्साह दिसत आहे. भारतात दरवर्षी सुमारे ८०० मैट्रीक टन एवढे सोने विकले जात आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर सोने-चांदीचे दर घटलेधनत्रयोदशीचा सोने- चांदी खरेदीचा मुहूर्त जवळ येत असताना हे भाव कमी होत असल्याने यंदा खरेदी अजून वाढण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर सोने- चांदीचे भाव कमी झाल्याने भावात घसरण होत असल्याचे सांगितले जात आहे. धनत्रयोदशीला होणाऱ्या एकूण विक्रीपैकी सोन्याचा वाटा सुमारे ७० टक्के असतो.