जळगाव - तत्कालीन जळगाव नगरपालिकेच्या घरकुल घोटाळ्यात दोषी ठरवून शिक्षा सुनावलेल्या 5 नगरसेवकांविरुद्ध अपात्रतेची कारवाई करण्याच्या हालचाली सुरू आहेत. या विषयासंदर्भात महापालिका प्रशासनाने कायद्यातील तरतुदी तपासण्यासाठी विधी अधिकार्यांचा अभिप्राय मागवला आहे. विधी अधिकाऱ्यांकडून अभिप्राय प्राप्त झाल्यानंतर प्रशासन कारवाई करण्याच्या विचारात आहे.
तत्कालीन नगरपालिकेच्या घरकुल घोटाळ्यात 2 महिन्यांपूर्वी धुळे विशेष न्यायालयाने निकाल दिला आहे. यात तत्कालीन आमदारांसह महापालिकेशी संबंधित तत्कालीन नगराध्यक्ष, नगरसेवक आणि अधिकार्यांना दोषी ठरवत शिक्षा सुनावण्यात आली आहे. गुन्हा सिद्ध झालेल्या आणि नुकताच औरंगाबाद उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केलेल्या आरोपींमध्ये महानगरपालिकेचे 5 विद्यमान नगरसेवकांचा समावेश आहे. घरकुल प्रकरणात शिक्षा झाल्यानंतर विद्यमान नगरसेवकांविरुद्ध काय कारवाई केली? याबाबतची सविस्तर माहिती अधिकार कार्यकर्ता दीपक गुप्ता यांनी माहिती अधिकार अर्जाद्वारे महापालिका प्रशासनाकडे मागितली आहे.
हेही वाचा -उल्हासनगरात गोळीबार, 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू
गुप्ता यांच्या अर्जानंतर प्रशासन चांगलेच हादरले आहे. या विषयासंदर्भात गुप्ता यांचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर महापालिकेतील प्रशासकीय यंत्रणेत खळबळ उडाली आहे आणि कारवाईच्या हालचालींना गती मिळाली आहे. महापालिकेने तातडीने पत्राचा आधार घेत विधी अधिकार्यांचा अभिप्राय मागवला आहे. सदर प्रकरणात कायदेशीररित्या काय कारवाई करता येईल? याबाबत विचारणा केली आहे.