जळगाव - जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी सोसायटी म्हणजेच ग. स. सोसायटीतर्फे कोरोनाग्रस्तांसाठी ११ लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्यात आले आहे. याचा धनादेश आज (शुक्रावारी) राज्याचे पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचेकडे सुपूर्द करण्यात आला. गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी वैयक्तीक पातळीपासून ते विविध व्यापारी, उद्योजक, सामाजिक संस्था, सहकारी संस्था आदींनी मदत करण्याचे आवाहन केले आहे. याला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे.
मंत्री पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जळगावच्या कृषी उत्पन्न बाजार समितीने ५ लाखांची मदत केली. यानंतर धरणगावच्या नगरपरिषदेनेही मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत प्रदान केली. यानंतर आता ग.स. सोसायटीनेही ११ लाखांचा निधी दिला. ग.स. सोसायटीचे चेअरमन मनोज पाटील यांनी धनादेश प्रदान केला. याप्रसंगी सोसायटीचे उपाध्यक्ष सुनील पाटील, संचालक तुकाराम बोरोले, विलास नेरकर, एन.एस. पाटील आदी उपस्थित होते. यावेळी गुलाबराव पाटील यांनी ग.स. सोसायटीच्या दातृत्वाचे कौतुक केले.