महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आता मुलीचं लग्न कसं करू? मंगरूळच्या शेतकऱ्याची व्यथा - राजेंद्र पाटील

अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथील राजेंद्र गजानन पाटील या दुष्काळाने पिचलेल्या शेतकऱ्याची व्यथा 'ई-टीव्ही भारत'ने मांडली आहे.

राजेंद्र पाटील

By

Published : Jun 11, 2019, 8:49 AM IST

Updated : Jun 11, 2019, 4:10 PM IST

जळगाव -धरणगाव, पारोळा, एरंडोल आणि अमळनेर या तालुक्यांमध्ये गेल्या ४ ते ५ वर्षांपासून सातत्याने दुष्काळ पडत आहे. सततच्या दुष्काळामुळे येणाऱ्या नापिकीने या तालुक्यांमधील शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त झाले आहेत. मुलांचे शिक्षण करणे तसेच उदरनिर्वाह करणे शेतकऱ्यांना अवघड झाले आहे. याच पार्श्वभूमीवर मंगरूळ येथील राजेंद्र गजानन पाटील या दुष्काळाने पिचलेल्या शेतकऱ्याची व्यथा 'ई-टीव्ही भारत'ने मांडली आहे.

जिल्ह्याचा पश्चिम पट्टा हा अवर्षणप्रवण भाग म्हणून ओळखला जातो. या भागातील दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या आशा-आकांक्षांना मुरड घातली जात आहे. शिवाय त्यांच्या मुला-मुलींची स्वप्नांचा देखील चुराडा होत आहे. अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथील राजेंद्र गजानन पाटील या दुष्काळाने पिचलेल्या शेतकऱ्याची व्यथा 'ई-टीव्ही भारत'ने मांडली आहे.

राजेंद्र पाटील

यावर्षी पाऊस लांबण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे राजेंद्र पाटलांचा प्रत्येक दिवस खरीपाच्या चिंतेने सुरू होतो. दुपारी उन्हाचा कडाका जास्त असल्याने सकाळी लवकर जनावरांच्या चारा आणि पाण्याची व्यवस्था केल्यावर ते बैलगाडी घेऊन शेतात निघाले. हाती पैसा नसल्याने ट्रॅक्टरऐवजी बैलांच्या मदतीने ते खरीपासाठी शेतीची मशागत करत आहेत. सकाळी साधारण १० वाजण्याच्या सुमारास उन्हाचे चटके जाणवू लागल्यावर सोबत आणलेली शिदोरी सोडायची आणि पोट भरायचे. दुपारी १ वाजण्याच्या सुमारास उन्ह वाढल्यावर बैलगाडी घेऊन परत घरी यायचे. घरी आल्यावर जेवण करून थोडा आराम. पुन्हा सायंकाळी जनावरांच्या चारा-पाण्याची व्यवस्था करायची. दरम्यानच्या काळात घरातील व्यक्ती असो किंवा गावातील इतर शेतकरी. सर्वांसोबत एकच चर्चा; ती म्हणजे यावर्षी पाऊस कधी येईल, पेरणी कशी करायची? जगात, आपल्या देशात काय चालले, याच्याशी खरंच या जगाच्या पोशिंद्याला काहीएक देणेघेणे नसल्याची प्रचिती आली.

अशा जगण्यापेक्षा मरण आलेलं बरं!

पती-पत्नी, दोन मुली, एक मुलगा, म्हातारी आई, विधवा बहीण असे राजेंद्र पाटील यांचे कुटुंब आहे. त्यांच्याकडे वडिलोपार्जित २ हेक्टर २० आर इतकी शेती आहे. फार पूर्वी बागायती असलेली त्यांची शेती आज जिरायती असून पूर्णपणे पावसाच्याच पाण्यावर अवलंबून आहे. शेतात एक विहीर आहे. पण सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे तिला पाणी नाही. दुष्काळामुळे गेल्या ४ ते ५ वर्षांपासून त्यांना शेतीतून उत्पन्न मिळालेले नाही. शेती वगळता दुसरा उत्पन्नाचा स्त्रोत नसल्याने दरवर्षी ते मोठ्या अपेक्षेने नातेवाईक, खासगी सावकार तसेच विकास सोसायटीकडून कर्ज घेऊन पेरणी करत गेले. मात्र, दुष्काळाने त्यांच्या हाती काहीही आले नाही.

शेतीत टाकलेला खर्चही न निघाल्याने त्यांच्या डोक्यावर आतापर्यंत तब्बल ५ लाख रुपयांचे कर्ज आहे. ३ वर्षांपूर्वी मोठ्या मुलीच्या लग्नासाठी त्यांनी सावकाराकडून १ लाखांचे कर्ज घेतले होते. एकरभर शेत गहाण ठेऊनही ते कर्जाची परतफेड करू शकले नाहीत. आता तर त्यांची लहान मुलगी देखील लग्नाला आली आहे. यावर्षी तिच्यासाठी ४ ते ५ स्थळे आली आहेत. मात्र, मुलाकडील लोकांना मोठ्या हुंड्याची अपेक्षा असल्याने राजेंद्र पाटील यांची इच्छा असूनही कला पदवीधर असलेल्या मुलीचे लग्न करता येत नाही. डोक्यावर कर्जाचा डोंगर असताना व्याजाने पैसे घेऊन मुलीचे लग्न करण्याची त्यांची हिंमत होत नाही. डोक्यावरचे कर्ज, मुलीचे लग्न असे अवघड प्रश्न समोर असताना पत्नीच्या आजारपणामुळे ते पुरते खचले आहेत. अशा जगण्यापेक्षा मरण आलेले बरे, असे ते म्हणतात. महिनाभरापूर्वी मोठ्या मुलीच्या बाळंतपणासाठी त्यांना सुमारे ३० ते ३५ हजार रुपये खर्च आला. पत्नीचे दागिने विकून त्यांनी हा खर्च भागवला. आता खरीपात पेरणीसाठी बियाणे, खते घेण्यासाठी पैसेच नसल्याने कोणासमोर हात पसरावेत, कोणासमोर गहाण रहावे, असे उद्विग्न सवाल त्यांनी उपस्थित केले आहेत.

मुलावर आहे घर खर्चाची भिस्त -

राजेंद्र पाटलांना एक मुलगा आहे. तो सुरतला कामाला आहे. तो जे पैसे पाठवतो, त्याच्यावरच घरचा खर्च भागतो. ४ ते ५ वर्षांपासून सतत दुष्काळ पडत असल्याने राजेंद्र पाटील यांच्यावर कर्ज वाढले. विकास सोसायटीत त्यांच्या नावे २ खाती आहेत. दोन्ही खात्यांवर त्यांनी कर्ज काढले आहे. पण कर्जाची परतफेड करू न शकल्याने ती खाती २०१५ पासून गोठली आहेत. विकास सोसायटीच्या दोन्ही खात्यांवर कर्जाचा बोजा असल्याने राष्ट्रीयीकृत बँका तर कर्जासाठी त्यांना उभे देखील करत नाही. दुसरीकडे सावकारांचे आधीचे कर्ज फेडले नसल्याने आता परत कर्ज मिळण्याची शक्यता नाही. सरकारने कर्ज माफीची घोषणा केली. पण दुर्दैवाने कर्ज माफीच्या यादीत त्यांचे नाव नसल्याने त्यांना एक रुपयाचा देखील फायदा झालेला नाही. अशा परिस्थितीत त्यांचा धीर सुटत चालला आहे.

निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती जोखमीची होत चालली आहे. दिवसेंदिवस पाऊस कमी कमी होत असल्याने शेतकऱ्यांचे जगणे अवघड झाले आहे. ही अवस्था दुष्काळाने पिचलेल्या एकट्या राजेंद्र पाटलांचीच नाही तर संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आहे.

Last Updated : Jun 11, 2019, 4:10 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details