महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दिलासादायक.. जळगाव जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट 10 टक्क्यांच्या आत, रिकव्हरी रेटही वाढून 92.18 टक्क्यांवर - जळगाव कोरोनाबाधित रुग्णसंख्या

जळगाव जिल्ह्यात कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी ब्रेक दी चेन अंतर्गत उपाययोजना सुरू आहेत. सध्या जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट 10 टक्क्यांच्या आत आला असून, रिकव्हरी रेटही वाढून 92.18 टक्क्यांवर पोहचला आहे.

jalgaon-districts-positivity-rate-decrease
jalgaon-districts-positivity-rate-decrease

By

Published : May 23, 2021, 5:51 PM IST

जळगाव - कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या विविध उपाययोजना तसेच लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्थांच्या सहकार्याने जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण सतत वाढत आहे. ही जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब आहे. सध्या जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट 10 टक्क्यांच्या आत आला असून, रिकव्हरी रेटही वाढून 92.18 टक्क्यांवर पोहचला आहे. कोरोनाची दुसरी लाट धडकल्यानंतर पहिल्यांदाच जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट 10 टक्क्यांच्या आत आला आहे.

जळगाव जिल्ह्यात कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी ब्रेक दी चेन अंतर्गत उपाययोजना सुरू आहेत. बाधित आढळणाऱ्या रुग्णांच्या संपर्कातील तसेच संशयित रुग्णांचा शोध घेऊन कोरोनाची लक्षणे दिसून येणाऱ्या व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. त्यामुळे बाधित रुग्णांचा लवकर शोध लागून त्यांच्यावर वेळेत उपचार होत आहेत. यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असून, मृत्यूदर रोखण्यातही आरोग्य यंत्रणेला यश येत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांचे लसीकरण देखील करण्यात येत असून, यासाठी जिल्हाभरात लसीकरण केंद्र सुरू आहेत.

जळगाव जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट 10 टक्क्यांच्या आत
आरोग्य यंत्रणेवरील ताण काही अंशी ओसरला -
जिल्ह्यात सध्या बहुतांश तालुक्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण झपाट्याने कमी होत आहे. कडक निर्बंधांचा सकारात्मक परिणाम दिसू लागला आहे. गेल्या महिन्याभरापूर्वी अनेक रुग्णालयांमध्ये बेड शिल्लक नव्हते. त्यामुळे अनेक रुग्ण उपचारासाठी मुंबई, पुणे यासारख्या शहरांमध्ये धाव घेत होते. मात्र, सध्या हे चित्र बदलले आहे. बहुतांश रुग्णालयांमधील बेड रिक्त आहेत. ऑक्सिजन आणि औषधी टंचाईची समस्या देखील निकाली निघाली आहे. जिल्ह्यातील रुग्णसंख्या कमी झाली असली तरी जबाबदारी मात्र, कायम आहे. रुग्णसंख्येचा आलेख असाच कमी करण्यासाठी प्रत्येकाने कोरोनाची नियमावली काटेकोरपणे पाळणे अपेक्षित आहे, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.
रुग्णसंख्या 30 टक्क्यांनी घटली-
कोरोनाच्या घटत्या रुग्णसंख्येबाबत बोलताना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले की, कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर जिल्ह्यात दररोज हजारांपेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत होते. मात्र, तब्बल दोन ते अडीच महिन्यांनी चित्र बदलले आहे. आता दररोज आढळून येणाऱ्या बाधित रुग्णांची संख्या ही 500 पेक्षा कमी येत आहे. जिल्ह्यातील नव्याने आढळणाऱ्या बाधित रुग्णांची संख्या ही 30 टक्क्यांनी घटली आहे. मार्च महिन्यानंतर पहिल्यांदा जिल्ह्यातील ऍक्टिव्ह रुग्णसंख्या ही घटून 8 हजारांपर्यंत खाली आली आहे. पॉझिटिव्हिटी रेट देखील घसरला असून, तो 3 ते 4 टक्क्यांपर्यंत खाली येईपर्यंत आपण कोणत्याही प्रकारची रिस्क घेणार नाहीत. ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रीटमेंट या त्रिसूत्रीवर आपले काम सुरूच राहणार आहे, असेही जिल्हाधिकारी राऊत म्हणाले.
असे मिळवले परिस्थितीवर नियंत्रण-
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यातील परिस्थिती हाताबाहेर गेली होती. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तातडीने आवश्यक त्या उपाययोजना केल्या. ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रीटमेंट या त्रिसूत्रीचा अवलंब केला. विशेष म्हणजे, कोरोनाच्या चाचण्या वाढवल्या. पूर्वी दिवसाला 5 ते 6 हजार चाचण्या व्हायच्या. त्या वाढवून 12 ते 14 हजारांपर्यंत केल्या. यातून बाधित रुग्ण लवकर समोर येऊन त्यांच्यावर वेळीच उपचार झाले. त्यामुळे साखळी खंडित होऊन पॉझिटिव्हिटी घटण्यास मदत झाली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रशासनाने हॉटस्पॉट लक्ष्य केले. त्याठिकाणी कंटेंटमेंट झोन, तपासणी आणि उपचाराची सुविधा वाढवली. यामुळे कोरोनाला रोखणे शक्य झाले.
मे महिन्याच्या सुरुवातीपासून घटली रुग्णसंख्या-
दुसरी लाट उसळली तेव्हा तिची तीव्रता अधिक होती. मात्र, एप्रिल महिन्याच्या शेवटी ती काहीअंशी मंदावली. 1 मे पासून नव्याने बाधित आढळणाऱ्या रुग्णांची संख्या घटण्यास सुरुवात झाली. 30 एप्रिल रोजी जिल्ह्यात 1007 बाधित रुग्ण आढळले. त्यानंतर मात्र, सातत्याने रुग्णसंख्या घटली. 1 मे पासून रुग्णसंख्या ही एक हजारांच्या आतच आहे, आता तर गेल्या 5 दिवसांपासून रुग्णसंख्या पाचशेच्या आत आहे.
आकडेवारीवर एक नजर -
जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या- 137951एकूण बरे झालेले रुग्ण- 127167रिकव्हरी रेट- 92.19 टक्केमृत्यूदर- 1.80 टक्केऍक्टिव्ह रुग्णसंख्या- 8306लक्षणे असलेले रुग्ण- 1569लक्षणे नसलेले रुग्ण- 6737होम आयसोलेशनमधील रुग्ण- 6254'सीसीसी'मधील रुग्ण- 483विलगीकरणातील रुग्ण- 260'डीसीएचसी'मधील रुग्ण- 1171'डीसीएच'मधील रुग्ण- 398ऑक्सिजनवरील रुग्ण- 838आयसीयूतील रुग्ण- 475
तालुकानिहाय बरे झालेले रुग्ण-
जळगाव शहर- 31236, जळगाव ग्रामीण- 5008, भुसावळ- 11506, अमळनेर- 8582, चोपडा- 13517, पाचोरा- 4381, भडगाव- 3380, धरणगाव- 5023, यावल- 4159, एरंडोल- 6217, जामनेर- 8283, रावेर- 5395, पारोळा- 4488, चाळीसगाव- 7774, मुक्ताईनगर- 4467, बोदवड- 2674 व इतर जिल्ह्यातील-1077.
तालुकानिहाय उपचार घेत असलेले रुग्ण-
जळगाव शहर- 627, जळगाव ग्रामीण- 257, भुसावळ- 911, अमळनेर- 348, चोपडा- 768, पाचोरा- 408, भडगाव- 70, धरणगाव- 299, यावल- 347, एरंडोल- 299, जामनेर- 729, रावेर- 590, पारोळा- 236, चाळीसगाव- 982, मुक्ताईनगर- 848, बोदवड- 462 व इतर जिल्ह्यातील- 125.
तालुकानिहाय एकूण मृत्यू-
जळगाव शहर- 557, जळगाव ग्रामीण- 139, भुसावळ- 323, अमळनेर- 141, चोपडा- 160, पाचोरा- 130, भडगाव- 74, धरणगाव- 105, यावल- 131, एरंडोल- 107, जामनेर- 149, रावेर- 174, पारोळा- 44, चाळीसगाव-115, मुक्ताईनगर- 83, बोदवड- 46

ABOUT THE AUTHOR

...view details