जळगाव - राज्यात उसळलेली कोरोनाची दुसरी लाट आता काहीअंशी आटोक्यात आली आहे. त्यामुळे काल (शुक्रवारी) रात्री उशिरा राज्य सरकारने कमी पॉझिटिव्हिटी आणि ऑक्सिजन बेड्सची पुरेशी उपलब्धता असलेल्या १८ जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यात अनलॉकचे निर्देश दिले आहेत. जळगाव जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात असल्याने जिल्ह्याचा समावेश पहिल्या टप्प्यात आहे. जिल्हा सोमवारपासून अनलॉक होईल. स्थानिक पातळीवर जिल्हा प्रशासनाकडून निर्देश जारी केले जाणार आहेत.
जळगाव जिल्हा सोमवारपासून अनलॉक जिल्ह्यात सुमारे ४ हजार बेड्स रिकामे-
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बाधित रुग्णांच्या संख्येने बाराशेचा आकडा पार केला होता. रुग्णांना ऑक्सिजन बेड मिळण्यासाठी रुग्णालयांच्या चकरा माराव्या लागत होत्या. मात्र १५ ते २० दिवसांपासून जिल्ह्यासह जळगाव शहरातील कोरोना बाधितांची संख्या कमी झाल्याने दिलासा मिळाला आहे. दरम्यान, जिल्ह्यात सद्यस्थितीत ११५ कोविड रुग्णालये असून या रुग्णालयांतील ४ हजार ७८० बेडपैकी ३ हजार ९८९ बेड्स रिक्त आहेत. मार्च महिन्यात जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट आली. त्यावेळी गंभीर व मध्यम स्वरुपाच्या रुग्णांची संख्या अधिक होती. त्यामुळे ओटू बेडसाठी रुग्णांना वेटिंगवर थांबावे लागत होते. तर दुसरीकडे आयसीयूसह व्हेंटिलेटरवरील रुग्णांची संख्या अधिक असल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली होती. परंतु, जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नांमुळे आता स्थिती आटोक्यात आली आहे.
अनेक कोविड हॉस्पिटल्स बंद-
जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट उसळली तेव्हा रुग्णांची उपचारासाठी धावपळ सुरू होती. अशास्थितीत जिल्ह्यात शासकीय व खासगी मिळून सुमारे १३३ कोविड हॉस्पिटल होते. मात्र, आता कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आल्याने अनेक खासगी कोविड हॉस्पिटलकडून कोविड उपचार बंद करण्याचे प्रस्ताव जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाला प्राप्त झाले आहेत. २० ते २५ हॉस्पिटल बंद झाले आहेत. बाधितांची संख्या कमी झाली आहे. तर बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे बेड रिक्त झालेले बघायला मिळत आहे.
अॅक्टिव्ह रुग्णसंख्या ४ हजारांच्या आत-
जिल्ह्यातील अॅक्टिव्ह रुग्णसंख्या आता ४ हजारांच्या आत आली आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत ३ हजार ८२९ अॅक्टिव्ह रुग्ण असून, त्यात ८१३ रुग्ण लक्षणे असलेले तर ३०१६ रुग्ण लक्षणे नसलेले आहेत. होम आयसोलेशनमध्ये २ हजार ९१९, कोविड केअर सेंटरमध्ये ९७, विलगीकरण सेंटरमध्ये १९४, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये ६१७, डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये १९६ रुग्ण आहेत. दिलासादायक बाब म्हणजे, ऑक्सिजन प्रणालीवर आता अवघे ४३६ तर अतिदक्षता विभागात २२२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ९५.४६ टक्क्यांवर-
एप्रिल आणि मे महिन्यात जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेली होती. तेव्हा जिल्ह्याचा रिकव्हरी रेट हा ७५ टक्क्यांपर्यंत घसरला होता. पण आता रिकव्हरी रेट वाढून ९५.४६ टक्क्यांवर आला आहे. मृत्यूदरही नियंत्रणात असून तो १.८१ टक्के इतका आहे. जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट देखील दीड ते पावणे दोन टक्क्यांवर आहे.
'ट्रिपल टी' सूत्रामुळे संसर्ग नियंत्रणात-
जळगाव जिल्हा प्रशासनाने कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रीटमेंट या ट्रिपल टी सूत्राचा अवलंब केला. यामुळे बाधित रुग्णांच्या संपर्कातील लोकांना वेळीच अलग करणे, लागण झालेल्यांवर उपचार करणे शक्य झाले. याशिवाय कंटेंन्मेंट झोनची प्रभावी अंमलबजावणी केल्याने संसर्गाचा फैलाव रोखता आला. म्हणून दुसरी लाट तीव्र असूनही वेळीच नियंत्रणात आली, असे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितले.
...तरीही काही निर्बंध असतील कायम- जिल्हाधिकारी
राज्य सरकारच्या निकषांमध्ये जळगाव जिल्हा लेव्हल एकमध्ये असला तरी पूर्णपणे अनलॉक न करता काही प्रमाणात निर्बंध कायम राहतील, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली. ते म्हणाले की, दोन दिवसात जिल्ह्यातील अनलॉकबाबत निर्देश जारी केले जातील. राज्य सरकारच्या निकषांनुसार आपण पूर्ण अनलॉक करू शकत असलो तरी काही प्रमाणात तरी निर्बंध राहतीलच. जिल्हा प्रशासनाने कोरोनाच्या दुसर्या लाटेचा यशस्वी प्रतिकार केला. परिस्थिती आता नियंत्रणात असली तरी हलगर्जीपणामुळे पूर्वीप्रमाणे वेळ येऊ नये म्हणून काही बंधने आपल्याला स्वतःवर घालून घ्यावी लागणार आहेत. जिल्ह्यात संभाव्य तिसरी लाट आलीच तर तिचा मुकाबला करण्याची तयारी आतापासून करून ठेवलेली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अनलॉक होत असले तरीही मास्क, डिस्टन्सिंग व सॅनिटायझेशनच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन अभिजीत राऊत यांनी जिल्हावासीयांना केले आहे.