जळगाव - केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणांचा निषेध म्हणून देशभरातील विविध कामगार संघटनांनी आज (बुधवारी) देशव्यापी बंद पुकारला आहे. या बंदला जळगाव जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले. जळगावात विविध कामगार संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चे काढत आपल्या मागण्यांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. विविध मोर्चांमुळे जिल्हाधिकारी कार्यालय चांगलेच दणाणले होते.
केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणांचा निषेध नोंदविणे, सरकारी क्षेत्राच्या खासगीकरणाला विरोध करणे तसेच वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी संघटीत, असंघटीत, कंत्राटी तसेच रोजंदारी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी देशव्यापी बंदची हाक दिली आहे. या बंदमध्ये जळगाव जिल्ह्यातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, सीआयटीयू प्रणित जळगाव जिल्हा बांधकाम संघटना, सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन संलग्न जळगाव वर्कर्स युनियन, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स असोसिएशन, महानगर आशा कर्मचारी संघटना, घरेलू कामगार संघटना, शेतमजूर संघटना, किसान सभा, रेशन बचाव समिती तसेच महाराष्ट्र सेल्स अँड मेडिकल रिप्रेझेन्टेटिव्ह असोसिएशनने सहभाग नोंदवला. शिक्षण क्षेत्रातील विविध संघटनांसह बँक कर्मचाऱ्यांच्या संघटना देखील या बंदमध्ये सहभागी झाल्या. राज्य राजपत्रित अधिकारी महासंघासह महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन आणि महसूल कर्मचारी संघटना देखील बंदमध्ये सहभागी होत्या.