जळगाव -भाजपचे जळगाव जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी नवे जिल्हाध्यक्ष म्हणून भडगावचे डॉ. संजीव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. पाटील हे भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत. सध्या त्यांच्यावर भाजपच्या वैद्यकीय आघाडीचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी होती.
उदय वाघ यांच्या पत्नी विधानपरिषद आमदार स्मिता वाघ यांना भाजपने लोकसभा निवडणुकीत जळगाव लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. त्यांनी आपला उमेदवारी अर्ज देखील दाखल केला होता. मात्र, त्यानंतर लगेचच पक्षाने अंतर्गत सर्वेक्षणाचे कारण पुढे करत त्यांची उमेदवारी कापून त्यांच्याऐवजी चाळीसगाव तालुक्याचे आमदार उन्मेष पाटील यांना उमेदवारी बहाल केली. याच वेळी स्मिता वाघ यांच्या आधी भाजपकडून लोकसभेची उमेदवारी कापण्यात आलेले ए. टी. पाटील यांच्या समर्थकांच्या मेळाव्यात अमळनेरचे माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांनी वाघ दाम्पत्यावर घणाघाती टीका केली होती. या टीकेचे पडसाद उन्मेष पाटील यांच्या प्रचारासाठी अमळनेरात आयोजित युतीच्या जाहीर प्रचारसभेत उमटले होते. या सभेत उदय वाघ आणि त्यांच्या समर्थकांनी डॉ. बी. एस. पाटील यांना जलसंपदामंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या समक्ष बेदम मारहाण केली.