जळगाव- जिल्ह्यात सद्यस्थितीत एकही काेराेना पाॅझिटिव्ह रुग्ण नाही. त्यामुळे तूर्तास जळगाव जिल्हा काेराेनामुक्त झालेला असला तरी धाेका कायम आहे. भविष्यात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तरी तिचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन दक्ष आहे. आपत्कालीन परिस्थितीसाठी जिल्ह्यात रुग्णालयांची 'थ्री टायर सिटीम्स' तयार करण्यात येणार आहे. त्यामध्ये काेव्हिड केअर, काेव्हिड हेल्थ केअर आणि काेव्हिड हाॅस्पिटल अशी त्रिस्तरीय रचना असेल, याबाबतची माहिती आज जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली.
वाढीव लाॅकडाऊनसंदर्भात बुधवारी जिल्हाधिकारी डाॅ. अविनाश ढाकणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, पाेलीस अधीक्षक डाॅ. पंजाबराव उगले, जिल्हा शल्यचिकित्सक नागाेराव चव्हाण उपस्थित हाेते.
जिल्हाधिकारी म्हणाले, जिल्ह्यात दाेन काेराेना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आले हाेते. त्यातील एकाचा मृत्यू झाला तर एकाचा आता अहवाल निगेटिव्ह आला आहे. सद्यस्थितीत जिल्हा रुग्णालयात ४७ संशयित दाखल आहेत. मंगळवारी नव्याने १३ दाखल झाले होते. हायरिस्क व लाे रिस्क अशी त्यांची वर्गवारी करण्यात आली असून, त्यांचे नमुने प्रयाेगशाळेत पाठवण्यात आलेले आहेत. त्यामुळे तूर्तास जिल्हा काेराेनामुक्त झाला, असे म्हणता येईल. मात्र, धाेका कायम आहे.