जळगाव - शहरातील सालारनगर मधील एका व्यक्तीला श्वास घेण्यासाठी त्रास होत होता. कोरोनासदृश्य आजाराची लक्षणे दिसून आल्याने खबरदारी म्हणून ती व्यक्ती रविवारी सकाळी स्वतःहून जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी दाखल झाली. सायंकाळी त्या व्यक्तीचा स्वॅब घेण्यात आला. परंतु, अहवाल येण्यापूर्वीच त्या व्यक्तीला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सोमवारी रात्री गर्ल्स हॉस्टेलमधील कोविड सेंटरमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांसोबत दाखल केले. यानिमित्ताने जिल्हा रुग्णालयाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय.
संशयित रुग्णाने आपल्यासोबत घडलेल्या प्रकाराबाबत मणियार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख यांच्याशी संपर्क साधून आपबिती कथन केली. त्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. फारुख शेख यांनी ही बाब कोविड रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय गायकवाड यांच्या निदर्शनास आणून दिली. घडलेल्या प्रकारामुळे आरोग्य यंत्रणा चांगलीच हादरली. शेख यांनी तक्रार केल्याने जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून सारवासारव करण्यात आली. एका संशयित रुग्णाला तुम्ही कोविड रुग्णासोबत रात्रभर ठेवलेले आहे. अद्याप तो त्याच ठिकाणी आहे, अशी तक्रार शेख यांनी भ्रमणध्वनीद्वारे केली. संशयित रुग्णाने देखील माझा अहवाल आलेला नसताना सुद्धा मला बाधित रुग्णांसोबत का ठेवण्यात आले आहे? असा प्रश्न उपस्थित केला आहे.