जळगाव -नाशिक महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात बुधवारी दुपारी एक भीषण दुर्घटना घडली. रुग्णालयातील ऑक्सिजन टँकला गळती लागल्याने ऑक्सिजन पुरवठा विस्कळीत झाला. त्यात पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन न मिळाल्याने 24 रुग्णांचा गुदमरून मृत्यू झाला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर जळगावातील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठा तसेच ऑक्सिजन प्लांटची परिस्थिती काय आहे? याचा 'ईटीव्ही भारत'ने रियालिटी चेक केला. त्यात समाधानकारक चित्र समोर आले. याठिकाणी आणीबाणीच्या काळात खबरदारी म्हणून 80 जम्बो ऑक्सिजन सिलिंडरचा बॅकअप ठेवण्यात आहे. त्यामुळे नाशिकसारखी गळतीची किंवा टँकमध्ये काही तांत्रिक अडचण आली तर बॅकपमध्ये असणाऱ्या सिलिंडरमधून रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा होऊ शकतो.
ऑक्सिजनच्या 80 जम्बो सिलिंडरचा बॅकअप -
जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दोन महिन्यांपूर्वी औरंगाबाद येथील सागर गॅस कंपनीच्या माध्यमातून ऑक्सिजन टँक उभारण्यात आला आहे. पूर्वीच्या नेत्र कक्षाच्या समोरील पटांगणात हा टँक उभारला असून, त्याची क्षमता 20 किलोलीटर इतकी आहे. ऑक्सिजन टँक कार्यान्वित झाला असला, तरी खबरदारी म्हणून रुग्णालय प्रशासनाने पूर्वी ज्याप्रमाणे रुग्णांना सिलिंडरद्वारे ऑक्सिजनचा पुरवठा केला जात होता, ती व्यवस्था देखील कायम ठेवली आहे. आणीबाणीच्या काळात सिलिंडरद्वारे ऑक्सिजनचा पुरवठा करता यावा, हा त्यामागचा उद्देश आहे. यासाठी रुग्णालयात ऑक्सिजनच्या 80 जम्बो सिलिंडरचा बॅकअप कायम ठेवण्यात येतो.
ऑक्सिजन पुरवठ्यावर लक्ष ठेवण्यासाठी आहे विशेष समिती-
जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठ्यावर लक्ष ठेवण्यासाठी 5 ते 6 जणांचा समावेश असलेली एक विशेष समिती अधिष्ठातांच्या मार्गदर्शनाखाली आधीपासूनच कार्यरत आहे. ही समिती दररोज प्रत्येक तासाला ऑक्सिजनचा साठा तसेच वितरण यंत्रणेवर लक्ष ठेऊन लेखी नोंदी घेत असते. या साऱ्या नोंदी वेळच्यावेळी वरिष्ठांना कळवल्या जातात. ऑक्सिजन पुरवठा आणि त्याच्याशी संबंधित साऱ्या बाबींचा तसेच कार्यवाहीचा दैनंदिन आढावा ठेवण्याचे काम या समितीवर आहे, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.