जळगाव - कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर आरोग्य यंत्रणेला बळकटी देण्याचे काम सुरू आहे. कोरोना दाखल होण्यापूर्वी जळगाव जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेत अनेक सुविधांचा अभाव होता. मात्र, आता हळूहळू परिस्थिती बदलत आहे. कोरोनाच्या उपचारात अत्यंत गरजेची बाब असलेल्या व्हेंटिलेटरच्या बाबतीत विचार केला तर जळगाव जिल्हा रुग्णालयासह जिल्ह्यातील इतर उपजिल्हा रुग्णालये व ग्रामीण रुग्णालये मिळून अवघे 10 व्हेंटिलेटर्स होते. मात्र, गेल्या वर्षभराच्या काळात जिल्ह्यातील व्हेंटिलेटर्सची संख्या सव्वादोनशेच्या जवळपास आहे. त्यात सर्वाधिक सव्वाशे व्हेंटिलेटर्स पीएम केअर फंडातून उपलब्ध झाले आहेत. काही तांत्रिक कारणास्तव त्यातील 7 ते 8 व्हेंटिलेटर्स बंद आहेत.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत मिळाले होते 13 व्हेंटिलेटर्स -
जळगाव जिल्ह्यात शासकीय रुग्णालयांमध्ये जवळपास 220 ते 230 व्हेंटिलेटर्स आहेत. त्यात जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सर्वाधिक 125 व्हेंटिलेटर आहेत. यापैकी निम्मे म्हणजेच 65 व्हेंटिलेटर हे पीएम केअर फंडातून आलेले आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेत 13 व्हेंटिलेटर तातडीने पीएम केअर फंडातून मिळाले होते. आता गेल्या आठवड्यातच पुन्हा 50 व्हेंटिलेटर मिळाले आहेत. इतर व्हेंटिलेटर हे जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून तसेच खासगी कंपन्यांच्या सीएसआर निधीतून जिल्हा रुग्णालयाला मिळाले आहेत. पीएम केअर फंडातून मिळालेले सर्व व्हेंटिलेटर अक्टिव्हेट आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
ग्रामीण भागासाठी दिले 60 व्हेंटिलेटर्स -
जळगाव जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालये व ग्रामीण रुग्णालयांमध्ये एकूण 70 व्हेंटिलेटर आहेत. यात 60 व्हेंटिलेटर हे पीएम केअर फंडातून मिळाले आहेत. पीएम केअरमधून मिळालेल्या 60 पैकी 7 ते 8 व्हेंटिलेटर हे बंद आहेत. काहींना सेन्सर नाही, काही सुरूच झाले नाहीत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली.