जळगाव -जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली आहे. सर्वपक्षीय पॅनल गठीत करण्यासंदर्भात शनिवारी दुपारी पार पडलेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत दोन तास काथ्याकूट करूनही चर्चा फिस्कटली. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत जाण्यास काँग्रेसने स्पष्ट शब्दांत नकार दिल्याने शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची अडचण झाली. ही निवडणूक भाजपला दूर ठेऊन महाविकास आघाडीच्या झेंड्याखाली लढवावी, अशी भूमिका आज काँग्रेसने मांडली. त्यामुळे उद्या (रविवारी) पुन्हा चर्चेची फेरी होण्याची शक्यता आहे.
काँग्रेसच्या ठाम भूमिकेमुळे सर्वपक्षीय पॅनलचा फज्जा; जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली - जळगाव जिल्हा बँक
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली आहे. सर्वपक्षीय पॅनल गठीत करण्यासंदर्भात शनिवारी दुपारी पार पडलेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भातील चर्चा फिस्कटली.
![काँग्रेसच्या ठाम भूमिकेमुळे सर्वपक्षीय पॅनलचा फज्जा; जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली jalgaon district bank Elections](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-13372731-792-13372731-1634385118540.jpg)
जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी आज दुपारी अजिंठा शासकीय विश्रामगृहात पालकमंत्री गुलाबराव पाटील, भाजप नेते गिरीश महाजन, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजीमंत्री गुलाबराव देवकर, डॉ. सतीश पाटील, आमदार शिरीष चौधरी, किशोर पाटील, सुरेश भोळे, माजी आमदार प्रा. चंद्रकांत पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, डी. जी. पाटील आदींची उपस्थिती होती. सुमारे दोन तास ही बैठक बंदद्वार चालली. पण त्यात सर्वपक्षीय पॅनल गठीत करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा निर्णय होऊ शकला नाही.
हे ही वाचा -भाजप नेते गिरीश महाजनांना करायचंय चित्रपटात काम, निर्मात्याला म्हणाले, एक संधी द्या!
काँग्रेसला बाजूला ठेऊन इतर तिन्ही पक्ष एकत्र येणार?
दरम्यान, काँग्रेसने आपली भूमिका ठामपणे जाहीर केल्याने आता भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची अडचण झाली आहे. त्यामुळे काँग्रेसला दूर ठेवून तीनही पक्ष एकत्र येण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे. त्याबाबतचे सूतोवाच पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन यांनी दिले आहेत. उद्या या संदर्भात बैठक होण्याची शक्यता आहे. जर अशी बैठक झाली, तर त्या बैठकीला काँग्रेसचे नेते हजेरी लावणार नसल्याचेही काँग्रेसच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.