जळगाव - जिल्हा बँकेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर आता इच्छुक उमेदवारांकडून विकास सोसायट्यांमध्ये ठराव झालेल्या व्यक्तींशी संपर्क साधण्यावर भर दिला जात आहे. अनेक तालुक्यांमध्ये काही उमेदवारांनी आधीच फिल्डींग लावून ठराव करून घेतले होते. मात्र, सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्रित निवडणूक लढण्याची शक्यता कमी असल्यामुळे अनेक ठिकाणी दिग्गज आमने-सामने आले आहेत. त्यामुळे पूर्वीचे ठराव सांभाळण्यावर आता भर दिला जात आहे. दरम्यान, अर्ज दाखल केल्यानंतर महाविकास आघाडीने ३ जागा जिंकल्या आहेत. आता बोदवडची जागाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जाण्याची चिन्हे आहेत.
एकेक मतासाठी होणार रस्सीखेच-
जिल्हा बँकेसाठी २१ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. सर्वपक्षीयच्या चर्चा सुरु असतानाच काँग्रेसने स्वबळाची घोषणा केल्यानंतर भाजपने देखील सर्वपक्षीयमधून काढता पाय घेतला. त्यामुळे महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी लढत होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत एकेक मत घेण्यासाठी उमेदवारांमध्ये रस्सीखेच होणार आहे. आमने-सामने दिग्गज असल्याने ठराव टिकवण्यासाठी उमेदवारांना चांगलीच धावपळ करावी लागणार आहे. दरम्यान, माघारीला अजून २० दिवस शिल्लक असल्याने या काळात ज्या जागा बिनविरोध काढता येतील, त्या जागांसाठी सर्वपक्षीय नेत्यांची खलबते सुरू झाली आहेत. माघारीच्या दिवसापर्यंत या चर्चा सुरू राहण्याची शक्यता आहे.
बोदवडची जागाही बिनविरोध होणार?
जिल्हा बँकेच्या उमेदवारी अर्ज माघारीआधीच महा विकास आघाडीच्या तीन जागा बिनविरोध निश्चित झाल्या आहेत. त्यातच आता बोदवड विकास सोसायटी मतदारसंघात देखील राष्ट्रवादी काँग्रेसकडून ॲड. रोहिणी खडसे व ॲड. रवींद्र पाटील यांचेच अर्ज आहेत. त्यात दोन्हीही उमेदवार राष्ट्रवादीचे असल्याने दोन्ही उमेदवारांपैकी एक उमेदवार माघार घेणार हे निश्चित आहे. त्यामुळे ही जागा देखील बिनविरोध मानली जात आहे. पुन्हा एक जागा महाविकास आघाडीच्या पारड्यात जमा होणार असून, भाजपला हा दुसरा धक्का असेल.