महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बारावीचा निकाल : जळगाव जिल्ह्याचा निकाल ८६.६१ टक्के, नाशिक विभागात जिल्हा अव्वल - nashik board

यावर्षी जळगाव जिल्ह्याचा निकाल ८६.६१ टक्के लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी जिल्ह्याचा निकाल २.४१ टक्क्यांनी वाढला आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र

By

Published : May 28, 2019, 5:08 PM IST

जळगाव- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल आज दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात आला. यावर्षी जळगाव जिल्ह्याचा निकाल ८६.६१ टक्के लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी जिल्ह्याचा निकाल २.४१ टक्क्यांनी वाढला आहे.

मागील वर्षी जळगाव जिल्ह्याचा निकाल ८४.२० टक्के लागला होता. नाशिक विभागात जिल्ह्याने अव्वल स्थान पटकावले आहे. त्यापाठोपाठ विभागात नाशिक जिल्हा ८४.१६ टक्केवारीसह दुसऱ्या तर नंदुरबार जिल्हा ८३.८३ टक्केवारीसह तिसऱ्या आणि धुळे जिल्हा ८३.५२ टक्केवारीसह चौथ्या स्थानी आहे. जळगाव जिल्ह्यातील ४२ हजार १०८ विद्यार्थी बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. त्यात २४८० विद्यार्थी विशेष प्राविण्यासह, १८ हजार ३६९ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, २० हजार ३४३ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर ९१६ विद्यार्थी हे तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
बारावीच्या परीक्षेसाठी जळगाव जिल्ह्यातील ४८ हजार ६९० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ४८ हजार ६१८ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ठ झाले होते. त्यात ४२ हजार १०८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

जिल्ह्यात विज्ञान शाखेचा सर्वाधिक निकाल

जळगाव जिल्ह्याच्या शाखानिहाय निकाल पाहता विज्ञान शाखेचा सर्वाधिक ९५.०७ टक्के निकाल लागला आहे. त्यापाठोपाठ वाणिज्य शाखेचा ९१.८७ टक्के, व्होकेशनल शाखेचा ८१.५२ टक्के तर कला शाखेचा सर्वाधिक कमी म्हणजे ७७.३० टक्के निकाल लागला आहे.

पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांचा निकाल ३५.८५ टक्के

जळगाव जिल्ह्यातील पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांचा निकाल केवळ ३५.८५ टक्के इतका लागला आहे. जिल्ह्यातील २७९५ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी २७९२ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ठ झाले होते. त्यात १००१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये ५ विद्यार्थी हे विशेष प्राविण्यासह, तर ४२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ९६ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर ८५८ विद्यार्थी हे तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

यावेळीही मुलांपेक्षा मुलीच अव्वल -

जळगाव जिल्ह्यात यावर्षी देखील बारावीच्या निकालात मुलींनी मुलांना मागे टाकत आम्हीच हुशार असल्याचे दाखवून दिले आहे. निकालाच्या टक्केवारीत मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९०.०८ टक्के इतकी आहे. तर मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ८४.२० टक्के इतकी आहे. जिल्ह्यात उत्तीर्ण झालेल्या एकूण ४२ हजार १०८ विद्यार्थ्यांमधून २४ हजार १७४ मुले तर १७ हजार ९३४ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.

यावर्षी जिल्ह्यातील २८ हजार ७१० मुलांनी तर १९ हजार ९०८ मुली परीक्षेसाठी प्रविष्ठ झाल्या होत्या. दरम्यान, पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांमध्येही मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी मुलांपेक्षा जास्त आहे. त्यात मुलींची टक्केवारी ३८.९५ टक्के तर मुलांची टक्केवारी ३४.९८ टक्के आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details