जळगाव जिल्हा सोमवारपासून होणार अनलॉक; लग्नसमारंभ, अंत्ययात्रेवर मात्र निर्बंध कायम
कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आल्याने जळगाव जिल्ह्यातील कडक निर्बंध तब्बल अडीच महिन्यांनी उद्यापासून (सोमवारी) शिथिल होत आहेत. अत्यावश्यक सेवांसह इतर सर्व प्रकारच्या सेवा आता रात्री 9 वाजेपर्यंत सुरू असतील. मात्र, लग्नसमारंभ, अंत्ययात्रेसाठी फक्त 50 लोकांच्या उपस्थितीला परवानगी असेल.
जळगाव -कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आल्याने जळगाव जिल्ह्यातील कडक निर्बंध तब्बल अडीच महिन्यांनी उद्यापासून (सोमवारी) शिथिल होत आहेत. अत्यावश्यक सेवांसह इतर सर्व प्रकारच्या सेवा आता रात्री 9 वाजेपर्यंत सुरू असतील. मात्र, लग्नसमारंभ, अंत्ययात्रेसाठी फक्त 50 लोकांच्या उपस्थितीला परवानगी असेल. त्याचप्रमाणे, धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम देखील 100 लोकांच्या उपस्थितीत अवघ्या 2 तासांच्या आत उरकावे लागतील. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी रविवारी सायंकाळी उशिरा अनलॉकचे नवे स्थानिक निर्देश जारी केले.
राज्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आल्याने राज्य सरकारने अनलॉकच्या दिशेने पाऊले टाकायला सुरुवात केली आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील 18 जिल्ह्यांमध्ये अनलॉकची प्रक्रिया सुरू होणार आहे. 5 टप्प्यात ही प्रक्रिया असणार आहे. राज्य सरकारने अनलॉक बाबतचे दिशानिर्देश स्पष्ट केल्यानंतर जळगाव जिल्ह्यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी रविवारी आदेश जारी केले. 3 जून अखेर जळगाव जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर 1.27 टक्के तर ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता 17.65 टक्के इतकी आहे. अनलॉकसाठीचे हे दोन्ही निकष जळगाव जिल्हा पूर्ण करत असल्याने जिल्ह्याचा समावेश पहिल्या टप्प्यात केला आहे. त्यानुसार उद्यापासून जिल्ह्यातील दैनंदिन व्यवहार व सर्व प्रकारच्या सेवा पूर्वपदावर येतील. दरम्यान, जिल्ह्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली असली तरी दर आठवड्यात जिल्ह्यातील कोरोनाच्या संसर्गाच्या स्थितीचा आढावा घेतल्यानंतर निर्बंधांचे स्तर ठरवले जाणार आहेत. त्यामुळे नागरिकांना शिस्तीने व जबाबदारीने वागावे लागणार आहे.
अशा प्रकारे असेल निर्बंधांमध्ये सूट-
-अत्यावश्यक व इतर सर्व प्रकारच्या सेवा (रात्री 9 वाजेपर्यंत, सर्व दुकानदारांनी आपल्या दुकानात 5 पेक्षा अधिक ग्राहकांना प्रवेश देऊ नये, दुकानाच्या दर्शनी भागात काच किंवा पारदर्शक शीट लावावी, सॅनिटायझेशनची व्यवस्था करावी)
-शॉपिंग मॉल, थिएटर्स, नाट्यगृह, सिंगल स्क्रिन मल्टिप्लेक्स (50 टक्के ग्राहक, प्रेक्षक क्षमतेसह)
-हॉटेल, रेस्टॉरंट व बार (50 टक्के ग्राहक क्षमतेसह सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत)
-सार्वजनिक ठिकाणे, मॉर्निंग वॉक, सायकलिंग, सर्व प्रकारच्या बैठका, ग्रामपंचायत निवडणूक/को-ऑपरेटिव्ह निवडणुका, बांधकामे, कृषी संबंधित कामे, सार्वजनिक वाहतूक, माल वाहतूक, सर्व कंपन्या, औद्योगिक आस्थापना (दिवसभर सुरू)
-आंतरजिल्हा प्रवासासाठी ई पासची गरज नाही (लेव्हल 5 मध्ये समावेश असणाऱ्या जिल्ह्यात प्रवासासाठी ई पास मात्र आवश्यक)
-खासगी कार्यालये व सरकारी कार्यालये 100 टक्के उपस्थितीसह सुरू असतील
-क्रीडा प्रकार, तत्सम स्पर्धा (50 टक्के प्रेक्षक क्षमतेसह)
-जिम, सलून, ब्युटी पार्लर, स्पा तसेच वेलनेस सेंटर्स (50 टक्के ग्राहक क्षमतेसह)
..अन्यथा पुन्हा निर्बंध-
जळगाव जिल्ह्यातील परिस्थिती सध्या नियंत्रणात असल्याने जिल्हा प्रशासनाने कडक निबंधांमध्ये सूट दिली आहे. परंतु, भविष्यात जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी दर हा 5 टक्क्यांपेक्षा अधिक झाला किंवा ऑक्सिजन बेडची उपलब्धता 25 टक्केपेक्षा जास्त झाल्यास नव्याने सुधारित आदेश जारी केले जातील, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात स्पष्ट केले आहे.