जळगाव -राज्यातील धोबी समाजाला आरक्षण पूर्ववत लागू करावे, अशी मागणी धोबी समाजबांधवांनी केली आहे. धोबी समाजाच्या आरक्षणासंदर्भात राज्याच्या सामाजिक न्याय विभागाकडे प्रस्ताव पडून आहे. या प्रस्तावात काही त्रुटी आहेत. प्रस्तावातील त्रुटी दूर करून तो महिनाभरात केंद्र सरकारकडे पाठवावा. अन्यथा राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांना व मंत्र्यांना दिसतील तिथे काळे फासू, असा निर्वाणीचा इशारा धोबी समाजबांधवांकडून देण्यात आला आहे.
सोमवारी महाराष्ट्र राज्य परीट धोबी सेवा मंडळाच्या वतीने संपूर्ण राज्यभर काळ्या फिती, काळे मास्क लावून राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा निषेध म्हणून आंदोलन करण्यात आले. धोबी समाजाला हक्काच्या आरक्षणापासून राज्याचा सामाजिक न्याय विभाग वंचित ठेवत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.राज्यव्यापी आंदोलनाचा एक भाग म्हणून जळगावातही आंदोलन करण्यात आले. यावेळी हा इशारा राज्य सरकारला देण्यात आला. राज्यातील धोबी समाजाला गेल्या २५ ते ३० वर्षांपासून राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने चालवलेल्या टाळाटाळीचा व चुकीचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी धोबी समाजाचा आरक्षण प्रस्ताव केंद्राला मुद्दाम सदोष व त्रुटीपूर्ण पाठवत असल्याचे वारंवार दिसून आले आहे. त्यामुळे काळे आंदोलन करण्याची वेळ आल्याचा आरोप आंदोलनप्रसंगी धोबी समाजबांधवांनी केला. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री धनंजय मुंडे यांना या विषयासंदर्भात निवेदन देण्यात आले. महिनाभरात धोबी समाजाच्या आरक्षणाच्या मागणीची दखल घ्या, अन्यथा महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना काळे फासून आमच्या समाजावर झालेल्या अन्यायाचा उद्रेक जाहीर करण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
धोबी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष बालाजी शिंदे व प्रदेशाध्यक्ष विवेक ठाकरे यांच्या नेतृत्त्वात झालेल्या आंदोलनात कोअर कमिटीचे सदस्य ईश्वर मोरे, आरक्षण हक्क परिषदेचे प्रदेश कार्यवाहक दीपक सपकाळे, लाँड्री संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण राऊत, जिल्हा कार्याध्यक्ष जे. डी. ठाकरे, जनगणना समितीचे राज्य कार्यवाहक सुरेश ठाकरे, डेबूजी फोर्सचे जिल्हाध्यक्ष शंभू रोकडे, युवक महानगर जिल्हाध्यक्ष यशवंत सपकाळे, संत गाडगेबाबा पीक संरक्षण सोसायटीचे संचालक जयंत सोनवणे आदी सहभागी झाले होते. आंदोलनानंतर समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांना निवेदन देण्यात आले.
हेही वाचा -तापी नदीला पूर आल्याने सावधानतेचा इशारा, 'हतनूर' धरणाचे 32 दरवाजे उघडले
हेही वाचा -लाचखोर प्रांताधिकारी दीपमाला चौरेंसह लिपिक सानपला अटी-शर्तींवर जामीन