महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गिरीश महाजनांनी जळगावची वाट लावली; पालकमंत्री गुलाबराव पाटलांचा घणाघात - जळगाव गुलाबराव पाटील बातमी

जळगाव शहर महापालिकेसाठी जाहीर झालेल्या निधीची माहिती देण्यासाठी रविवारी दुपारी अजिंठा शासकीय विश्रामगृहात शिवसेनेच्यावतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील बोलत होते. यावेळी त्यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर सडकून टीका केली.

gulabrao patil on girish mahajan news
गिरीश महाजनांनी जळगावची वाट लावली

By

Published : May 2, 2021, 5:26 PM IST

जळगाव -'महापालिकेच्या निवडणुकीत शहरासाठी 100 कोटी आणू, 200 कोटी आणू अशा वल्गना भाजप नेते गिरीश महाजन यांनी केल्या होत्या. मात्र, प्रत्यक्षात त्यांनी शहराची वाट लावली', असा घणाघाती आरोप जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केला. दरम्यान, जिल्हा नियोजन समितीतून जळगाव महापालिकेला विविध विकासकामांसाठी 61 कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. जळगाव शहर महापालिकेसाठी जाहीर झालेल्या निधीची माहिती देण्यासाठी रविवारी दुपारी अजिंठा शासकीय विश्रामगृहात शिवसेनेच्यावतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील बोलत होते. यावेळी त्यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर सडकून टीका केली.

प्रतिक्रिया

तेव्हा तर तुम्ही मुख्यमंत्र्यांजवळ बसत होते ना -

आम्ही जळगाव शहराच्या विकासासाठी जिल्हा नियोजन समितीकडून 61 कोटी रुपयांचा निधी जाहीर केला आहे. या निधीतून सर्वपक्षीय नगरसेवकांच्या प्रभागात विकासकामे करण्यावर भर दिला आहे. शहराचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. मात्र, गेल्या काळात पालकमंत्री असताना भाजपचे चंद्रकांत पाटील किंवा गिरीश महाजन यांनी शहरासाठी जिल्हा नियोजन विभागाकडून किती रुपये दिले याची आकडेवारी दाखवावी. मी एका वर्षात 61 कोटी रुपये देऊ शकतो. तर यांनी काय दिले ते जाहीर करावे. तेव्हा तर गिरीश महाजन हे मुख्यमंत्र्यांजवळ बसत होते. ते निधी आणू शकत होते. पण त्यांनी जिल्ह्यासाठी काहीही केले नाही, असा आरोपही मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला.

वर्षाभरात डीपीडीसीचा 97 टक्के निधी वाटला -

जिल्हा नियोजन समितीमधून एका वर्षातच 97 टक्के निधी हा जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये वाटप केला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात निधीला मान्यता देणारा मी पहिलाच पालकमंत्री असल्याचा दावादेखील त्यांनी केला. आम्ही विकासाचे राजकारण करतो, केवळ वल्गना करत नाही. जामनेर, मुक्ताईनगर, चाळीसगाव अशा तालुक्यातदेखील आम्ही निधीचे वाटप केले आहे. त्या नगरपालिकेत भाजपची सत्ता असली तरीही निधी वाटपात कुठलाही भेदभाव केला नाही. मात्र, गिरीश महाजन हे निधी वाटपाच्या वेळेस केवळ भाजपच्याच लोकप्रतिनिधींचा विचार करत होते, असाही आरोप गुलाबराव पाटील यांनी केला.

तापी पाटबंधारे महामंडळात काय बोंब पाडली?

जलसंपदा मंत्री असताना 5 तालुके अवलंबून असलेल्या निम्नतापी प्रकल्पासाठी एक दमडीही गिरीश महाजन यांनी दिली नाही. बलून-बलून म्हणत गिरणा नदीवरील बंधाऱ्यांचे स्वप्न दाखवले. ते बलूनच बनून राहिले आहेत. जलसंपदा सारखे वजनदार खाते असताना ते जिल्ह्याला सुजलाम सुफलाम करू शकले असते, पण ते केवळ भुलभुलय्या करत बाहेर फिरत राहिले. जिल्ह्याकडे जराही लक्ष दिले नाही. निष्क्रिय पालकमंत्री तेच होते, आमच्यावर आरोप करण्यापेक्षा स्वतःच्या कार्यकाळात काय केले ते पहावे, असा टोलाही गुलाबराव पाटील यांनी लगावला.

विरोधी नगरसेवकांच्या प्रभागातही कामे होणार-

जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जळगाव शहराच्या विकासासाठी जाहीर झालेल्या 61 कोटी रुपयांच्या निधीतून लवकरच कामे सुरू होतील. 15 दिवसांच्या आत निविदा प्रक्रिया राबवली जाईल. या निधीतून केवळ शिवसेनेच्या नव्हे, तर विरोधी पक्षाच्या नगरसेवकांच्या प्रभागातही कामे होणार आहेत. सुडाचे राजकारण आम्ही करत नाही, असेही गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा - 'पुद्दुचेरी आणि तामिळनाडू वगळता कुठेही सत्तापरिवर्तन होणार नाही'

ABOUT THE AUTHOR

...view details