जळगावJalgaon Crime News - मुलगा व मुलगी यांच्यात आजही भेदभाव करण्याची काही जणांमध्ये वृत्ती दिसते. याच वृत्तीमुळं चिमुरडीचा हकनाक जीव गेलाय. जामनेर तालुक्यातील हरिहर तांडा या गावात धक्कादायक घटना समोर आलीय. आधी दोन मुली, त्यात तिसरीही मुलगी झाल्याने बापानंच आठ दिवसांच्या चिमुरडीची हत्या केली. नराधम बापानं तोंडात तंबाखू देऊन चिमुरडीची हत्या (Murder Case in Jalgaon)करत मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी संशयित बापाला अटक केली आहे. गोकुळ गोटीराम जाधव (३०) असे या नराधम बापाचे नाव आहे. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
बापानेच केली चिमुरडीची हत्या :जामनेर तालुक्यातील वाकोदजवळ हरिनगर तांडा येथील रहिवासी गोकुळ जाधव याला दोन मुली आहेत. शनिवार, दि. २ सप्टेंबर रोजी वाकोद प्राथमिक आरोग्य केंद्रात तिसरे अपत्य मुलगी जन्माला आली. गोकुळनं रविवारी चिमुरडीच्या तोंडात तंबाखू टाकली. तिला झोळीत झोपविले. यात तिचा मृत्यू झाला. रात्री फर्दापूर ते वाकोद रस्त्यावर खड्डा खोदून मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचे आरोग्य पथकाच्या तपासात निष्पन्न झाले आहे.