जळगाव- शहरातील एका दाम्पत्याने बँकेत चक्क नकली सोने तारण ठेवून साडेआठ लाखांचे कर्ज घेत बँकेला चुना लावल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. बँकेने तारण सोने लिलावाला काढल्यानंतर ते नकली असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर बँकेच्यावतीने याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ललित बाळकृष्ण जाधव (वय ४१, रा. नवीपेठ, जळगाव) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
ललित बाळकृष्ण जाधव व त्यांची पत्नी आरती ललित जाधव हे आरोपी शहरातील जोशी पेठेतील रहिवासी आहेत. दोघेही शहरातील दि. खामगाव अर्बन को ऑपरेटीव्ह बँक, शाखा नवीपेठ या बँकेचे नियमित सभासद होते. दोघांनीही बँकेच्या सोने तारण कर्ज योजनेअंतर्गत ४ एप्रिल २०१७ सोने तारण ठेवून कर्ज घेतले. ललितच्या खात्यावर ४ लाख रुपये (२८५.२० ग्रॅम तारण) आणि आरतीच्या खात्यावरुन ४ लाख ५० हजार (२८५.६८० ग्रॅम) असे एकूण ८ लाख ५० हजार रुपये कर्जाची उचल केली. गेली तीन वर्षे संबंधित कर्जदारांनी कुठलीही परतफेड केली नाही. बँकेने सोने विक्रीला काढल्यावर बनावट सोन्याचा भंडाफोड झाला.
हेही वाचा-यावल शहरातील शेतमजुराची फसवणूक; ३१ हजारासह नववधूचा पोबारा
बँकेचा अधिकृत व्हॅल्युअर सराफही कटात सहभागी
जाधव दाम्पत्याने जोशी पेठेतच वास्तव्यास असलेल्या तसेच बँकेचे अधिकृत व्हॅल्युअर सराफ योगेश वाणी यांना हाताशी धरून सोने खरे असल्याचा अहवाल तयार केला आहे. नकली सोने तारण ठेऊन त्यांनी बँकेतून ८ लाख ५० हजार रुपये रोख कर्ज म्हणून लाटले. हे कर्ज ४ एप्रिल २०१८ पर्यंत फेडणे बंधनकारक असताना मुदतपुर्ण होऊनही कर्जफेड न झाल्याने कर्जदारांना बँकेने नोटीस पाठवली. बँकेने तारण सोने लिलावासाठी काढले. या सोन्याचे नव्या सराफाकडून मूल्यांकन केल्यावर सर्व सोने नकली असल्याचे निष्पन्न झाले. बँकेचे व्यवस्थापक गोपाळ नामदेव महाले यांनी २० ऑक्टोबर रोजी शहर पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरून पती-पत्नीसह खोट्या सोन्याचा अहवाल देणाऱ्या योगेश वाणी याच्या विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली हेाती.
हेही वाचा-मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपी देशी पिस्तुलासह जेरबंद
दोघे संशयित फरार-
आरोपी ललित बाळकृष्ण जाधव याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केल्यावर पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. त्याची पत्नी व बँकेचा अधिकृत सराफ योगेश वाणी या दोघांना अद्याप अटक झालेली नाही. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.