जळगाव - मनपाच्या आयुक्तपदी डॉ. माधवी खोडे- चवरे यांची नियुक्ती झाली आहे. बदलीचे आदेश जारी होवून आता २१ दिवस उलटूनदेखील अद्याप आयुक्त खोडे रूजू झालेल्या नाहीत. त्या जळगावात येण्यास अनुत्सुक आहेत. त्यामुळे त्यांची बदली रद्द करून त्याऐवजी दुसरा अधिकारी मिळावा, यासाठी मंत्रालयात जिल्ह्यातील राजकीय पदाधिकाऱ्यांकडून प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे.
महापालिका आयुक्त डॉ. उदय टेकाळे हे सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या रिक्त जागी नागपूर येथील वस्त्रोद्योग मंडळाच्या संचालिका डॉ. माधवी खोडे-चवरे यांची नियुक्ती झाली आहे. माधवी खोडे या यापूर्वी भंडारा, चंद्रपूर जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी, २०१३ ते २०१५ पर्यंत भंडारा येथील जिल्हाधिकारी, २०१५ ते २०१८ पर्यंत आदिवासी विभाग, नागपूर येथे अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत होत्या. २०१८ पासून वस्त्रोद्योग मंडळ, नागपूर येथे संचालक म्हणून कार्यरत आहेत.
दरम्यान, १२ फेब्रुवारीला डॉ. खोडे यांचे जळगाव महापालिका आयुक्तपदी बदली झाल्याचे आदेश पारित झाले होते. त्यानंतर त्या १७ फेब्रुवारी रोजी रुजू होवून महापालिका आयुक्तपदाचा पदभार घेणार होत्या. मात्र, त्या आल्याच नाहीत. बदलीचे आदेश होवून आता २१ दिवस उलटले तरी त्या रुजू झालेल्या नाहीत. त्या जळगाव महापालिकेत येण्यास इच्छुक नसल्याची चर्चा सुरु आहे.