जळगाव -जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयाला अखेर पूर्णवेळ कारभार सांभाळणारे अधिष्ठाता मिळाले आहेत. कोल्हापूर येथील अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या नियुक्तीचे आदेश वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी काढले. डॉ. रामानंद आज जळगावचे अधिष्ठाता म्हणून पदभार स्वीकारणार आहेत.
जळगावमध्ये कोरोना बाधित महिला गायब होती. तिचा मृतदेह शौचालयात सापडला. याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत होती. दरम्यान वृद्धेचा मृतदेह शौचालयात आढळून आल्याप्रकरणी राज्य सरकारने कारवाईची बडगा उगरला आहे. जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांचे निलबंन केले आहे. त्यानंतर डॉ. जयप्रकाश रामानंद यांची नियुक्ती झाली.
82 वर्षीय कोरोनाबाधित वृद्धेला 1 जूनला वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर वृद्ध व्यक्ती बेपत्ता झाली होती. याबाबत जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र, 8 दिवसांनी वृद्धेचा मृतदेह रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक 7 मधील शौचालयात कुजलेल्या अवस्थेत आढळला होता. या धक्कादायक घटनेनंतर आरोग्य यंत्रणेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला होता. त्यानंतर हे प्रकरण चांगलेच तापले असून, राज्य सरकारने ते गांभीर्याने घेतले आहे. या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्यात येत आहे.
सुरुवातीला अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांच्यासह तिघांचे निलंबन झाले. त्यानंतर पुन्हा 5 जणांवर कारवाई झाली आहे. वैद्यकीय अधीक्षक डॉ. किरण पाटील, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. आसिफ शेख यांच्यासह 3 सफाई कर्मचाऱयांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणी आतापर्यंत 8 जणांवर निलंबनाची कारवाई झाली आहे.