जळगाव- केंद्र सरकारने शेतकरी व कामगारांना संपवणारी विधेयके मंजूर केली आहेत. अन्यायकारक असलेले कृषी व कामगार विधेयक रद्द होत नाही, तोपर्यंत काँग्रेस पक्ष स्वस्थ बसणार नाही. या विधेयकांना विरोध करण्यासाठी जळगाव जिल्ह्यातून ५ लाख शेतकऱ्यांच्या स्वाक्षरी गोळा करण्यात येणार आहेत. तसेच, गुरुवारी (१५ ऑक्टोबर) ऑनलाइन पद्धतीने किसान क्रांती संमेलन घेण्यात येणार आहे, अशी माहिती आज काँग्रेसचे जळगाव जिल्हा निरीक्षक प्रकाश मुगदिया यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जळगाव जिल्हा काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, प्रदेश सरचिटणीस डी.जी. पाटील, प्रदीप पवार, राजीव पाटील, अविनाश पाटील, प्रवीण पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रकाश मुगदिया यांच्यासह अॅड. संदीप पाटील व डॉ. उल्हास पाटील यांनी कृषी विधेयक व कामगार विधेयक मंजूर केल्याबद्दल भूमिका मांडताना केंद्र सरकारवर टीका केली. दोन्ही विधेयकांमुळे देशातील शेतकरी व कामगार रसातळाला जाणार आहेत. लोकसभा व राज्यसभेत ही विधेयके मंजूर करताना विरोधी पक्षाला विश्वासात घेतले नाही. तसेच, चर्चा करण्याची संधी देखील दिली नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
त्यामुळे, काँग्रेसकडून या विधेयकांविरुद्ध जनआंदोलन सुरू करण्यात आल्याची माहिती या पत्रकार परिषदेत देण्यात आली. महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनापासून, अर्थात २ ऑक्टोबरपासून ते ३१ ऑक्टोबरपर्यंत या विधेयकांच्या विरोधात शेतकरी व कामगारांच्या स्वाक्षरी जमा केल्या जाणार आहेत. याबाबतचे निवेदन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या माध्यमातून राष्ट्रपती यांना देण्यात येणार आहे. राज्यातून २ कोटी तर जळगाव जिल्ह्यातून ५ लाख स्वाक्षरी घेण्यात येणार आहेत. कृषी विधेयकाच्या विरोधासाठी राज्यात १५ ऑक्टोबर रोजी किसान क्रांती संमेलन घेण्यात येणार असून, जळगाव जिल्ह्यासह राज्यभरात ७ हजार ठिकाणी संमेलनात ऑनलाइन पद्धतीने सर्वांना सहभागी करण्यात येणार आहे. या दोन्ही उपक्रमांची तयारी सुरू असल्याची माहिती देखील यावेळी देण्यात आली.