जळगाव- जिल्ह्यात पोळा सणानिमित्त विविध ठिकाणी बैलांची मिरवणूक काढून पोळा फोडण्याची पद्धत आहे. मात्र, कोरोना संसर्गामुळे यावर्षी पोळा सणाला उद्या (18 ऑगस्ट) काढण्यात येणाऱ्या बैलांच्या मिरवणुकीवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, तरीही पोळ्याच्या दिवशी बैलांची मिरवणूक काढल्यास कारवाईचा इशारा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिला आहे.
याबाबतचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी काढले. शेतकरी बांधवांनी घरीच बैलांची पूजा करून हा सण साजरा करावा. सार्वजनिक प्रसादाचे वाटप करू नये. कोणत्याही प्रकारची गर्दी करू नये. कोरोना संसर्गामुळे गुरांचे बाजारही बंद करण्यात आले आहे. ज्यांना गुरांची विक्री करायची आहे त्यांनी ऑनलाइन विक्री करावी. मोबाईलद्वारे संवाद साधून विक्री करावे, असे आदेश काढण्यात आले आहेत.
मंगळवारी पोळा सण असल्याने सोमवारी शेतकऱ्यांनी बैलांना नदीवर जावून पाण्याने धुतले. सोबतच त्याच्या अंगावर झूल, घुंगरू, आरशाचा साज असलेल्या वस्तूंची खरेदी केली. उद्या बैलांना सजविले जाणार असून त्याची पूजा करून त्यांना गोडधोड करून खायला दिले जाणार आहे. वर्षभर शेतात काम करणाऱ्या बैलांना पोळा सणानिमित्त विश्रांती देण्याची प्रथा आहे.
पोळा सण शेतकऱ्यांसह त्यांच्या कुटुंबियांसाठी उत्साहाचा दिवस असतो. आपला सर्जा-राजा चांगला दिसावा, यासाठी घरातील सर्वमंडळी बैलांना अधिकाधिक सजविण्याचा प्रयत्न करतात. सायंकाळी मिरवणुकीत आपली बैलजोडी रुबाबदार दिसायला पाहिजे, त्याने सर्वात आधी जावून पोळा फोडला पाहिजे, असे प्रत्येकाला वाटते. मात्र यंदा पोळा सणावर कोरोना संसर्गाचे विघ्न आले आहे. बैलाच्या मिरवणुकीला बंदी असल्याने काहीसा आनंद कमी झाल्याचे शेतकऱ्यांतून बोलले जात आहे.