जळगाव -कोरोनाबाधित रुग्णांसाठी लागणाऱ्या ऑक्सिजनची गरज लक्षात घेऊन जिल्हा रुग्णालयात 20 किलोलीटर क्षमतेचा लिक्विड ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आला आहे. औरंगाबाद येथील कंपनीने हा प्लांट दोन महिन्यांपूर्वीच उभारला आहे. मात्र, तो अद्यापही कार्यान्वित झालेला नाही. 'पेसो'च्या (पेट्रोलियम एक्सप्लोसिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशन) प्रमाणपत्राअभावी प्लांट कार्यान्वित झालेला नाही. पेसोचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ठेकेदार प्रयत्न करत नसल्याने प्लांट कार्यान्वित होऊ शकलेला नाही. अनेकदा मुदत देऊनही दुर्लक्ष करणाऱ्या ठेकेदाराला अखेर जिल्हा रुग्णालय प्रशासनाने नोटीस बजावली आहे.
जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आता आटोक्यात असून ऑक्सिजनची मागणी देखील घटली आहे. त्यानंतर ऑक्सिजन प्लांट उभारणीची प्रक्रिया झाली आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत कोरोनाचे अवघे 311 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. कोरोनाचा संसर्ग अधिक प्रमाणात असताना रुग्णसंख्या सातत्याने वाढत होती, अशा परिस्थितीत ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत होता. त्याचवेळी जर जलदगतीने कार्यवाही करून ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आला असता तर रुग्णालय प्रशासनाचे कष्ट वाचले असते. मात्र, कोरोना नियंत्रणात असताना आता ऑक्सिजन प्लांट उभारला जात असल्याने तो भविष्यातील अडचणीतच कामी येणार आहे.
वाहतूक खर्च आणि कर्मचाऱ्यांचे परिश्रम वाचणार -
धुळे आणि कोल्हापूरच्या धर्तीवर जळगावातील जिल्हा कोविड रुग्णालयात 65 लाख रुपयांच्या निधीतून स्वतःचा लिक्विड ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आला आहे. या माध्यमातून ऑक्सिजन सिलिंडर वाहतुकीचा खर्च आणि कर्मचाऱ्यांचे परिश्रम वाचणार आहेत. लिक्विड ऑक्सिजन प्लांट उभारणीबाबत माहिती देताना अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद म्हणाले की, कोरोनाचा उद्रेक होण्यापूर्वी कोविड रुग्णालयात एका दिवसाला अवघ्या 150 ते 200 ऑक्सिजन सिलिंडरची गरज भासत होती. मात्र, मध्यंतरी हे रुग्णालय फक्त कोरोनाच्या रुग्णांसाठी राखीव होते. जिल्हाभरातून गंभीर अवस्थेतील रुग्ण याठिकाणी दाखल करण्यात येत होते. रुग्णालयातील सुमारे साडेचारशे बेड हे व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनचे आहेत.