महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगावात स्टेट बँकेचे एटीएम फोडले; 14 लाख रुपयांची रोकड लांबवली

ज्ञात चोरट्यांनी शनिवारी मध्यरात्रीनंतर या एटीएम सेंटरमधील एटीएम मशीन गॅस कटरने फोडून त्यातून 14 लाख 41 हजार रुपयांची रोकड लंपास केली. यावेळी सुदैवाने एटीएममधील एक कॅश ट्रे चोरट्यांकडून उघडला नाही. त्यामुळे त्यातील 7 लाख रुपयांची रोकड सुरक्षित राहिली. रोकड काढल्यानंतर चोरटे पसार झाले आहेत.

jalgaon atm
जळगावात स्टेट बँकेचे एटीएम फोडले

By

Published : Jul 12, 2020, 1:36 PM IST

Updated : Jul 12, 2020, 2:16 PM IST

जळगाव -शहरातील शिवकॉलनी रेल्वे उड्डाणपुलाजवळ असणार्‍या स्टेट बँकेच्या शाखेचे एटीएम अज्ञात चोरट्यांनी फोडून 14 लाख रुपयांची रोकड लांबवली आहे. शनिवारी मध्यरात्रीनंतर ही घटना घडली असून ती रविवारी सकाळी उजेडात आली आहे. चोरट्यांनी एटीएम फोडण्यासाठी गॅस कटरचा वापर केला आहे. सुदैवाने एटीएमचा एक कॅश ट्रे न उघडल्याने त्यातील 7 लाख रुपयांची रोकड सुरक्षित राहिली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगावात स्टेट बँकेचे एटीएम फोडले; 14 लाख रुपयांची रोकड लांबवली

शहरातील शिवकॉलनी रेल्वे उड्डाणपुलाच्या अलीकडे महामार्गाच्या बाजूला स्टेट बँकेची शाखा आहे. याच शाखेच्या बाहेर बँकेचे एटीएम सेंटर आहे. त्यात एक कॅश डिपॉझिट आणि एक एटीएम अशी 2 मशिन्स आहेत. अज्ञात चोरट्यांनी शनिवारी मध्यरात्रीनंतर या एटीएम सेंटरमधील एटीएम मशीन गॅस कटरने फोडून त्यातून 14 लाख 41 हजार रुपयांची रोकड लंपास केली. यावेळी सुदैवाने एटीएममधील एक कॅश ट्रे चोरट्यांकडून उघडला नाही. त्यामुळे त्यातील 7 लाख रुपयांची रोकड सुरक्षित राहिली. रोकड काढल्यानंतर चोरटे पसार झाले आहेत. कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू असल्याने गेले काही दिवस चोरटे भूमिगत झाले होते. पण आता चोरटे पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. शहरात घरफोडीच्या घटना घडल्यानंतर आता चोरट्यांनी महामार्गावरील एटीएम फोडल्याने पोलीस यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे राहिल्याचे दिसून येत आहे.

जळगावात स्टेट बँकेचे एटीएम फोडले
सीसीटीव्हीत घटना झाली कैद-ही चोरीची घटना एटीएम सेंटरमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. चोरी करणारे तीन चोरटे असून ते तरुण आहेत. तिघांनी चेहऱ्यावर मास्क लावलेला होता. त्यातील दोघांनी एटीएम फोडून रोकड काढल्याचे सीसीटीव्हीत दिसत आहे. ही सारी घटना मध्यरात्रीनंतर दीड ते दोनच्या दरम्यान घडली. एटीएम सेंटर बाहेर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात फक्त एटीएम सेंटरच्या आजूबाजूचे चित्रीकरण होत असल्याने चोरटे वाहनाने आले होते की पायी आले होते? तसेच रोकड चोरल्यानंतर ते कोणत्या दिशेने पसार झाले? याची ठोस माहिती मिळू शकली नाही.
जळगावात स्टेट बँकेचे एटीएम फोडले
अशी आली घटना उजेडात-रविवारी सकाळी एटीएममध्ये चोरी झाल्याचे स्टेट बँकेच्या शेजारीच राहणारे योगेश शिवाजी जाधव नामक व्यक्तीच्या लक्षात आले. त्यांनी या घटनेची माहिती तत्काळ स्टेट बँकेचे शाखा व्यवस्थापक दिवेश चौधरी यांना दिली. चौधरी यांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, पोलीस उपअधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहोम, जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक अकबर पटेल घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या घटनेचा प्राथमिक पंचनामा केला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महामार्गावरील सीसीटीव्ही तपासणार -

एटीएममधून रोकड चोरल्यानंतर चोरटे महामार्गावरून पसार झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. त्यामुळे महामार्गावर दोन्ही दिशेला असलेले सुमारे 5 किलोमीटर अंतरावरील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले जाणार आहेत. त्यातून काही धागेदोरे मिळतात का? हे पाहणार असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, पोलिसांच्या ठसेतज्ञ, श्वानपथक देखील घटनास्थळी दाखल झाले होते. एटीएम मशीन, दरवाजे अशा ठिकाणांचे ठशांचे नमुने पोलिसांनी घेतले आहेत.

Last Updated : Jul 12, 2020, 2:16 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details