जळगाव - महाविकास आघाडीच्या माध्यमातून राज्याची सत्ता काबीज केल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने आता जिल्हा परिषद, पंचायत समितींकडे मोर्चा वळवला आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात खळबळ माजली आहे. जिल्ह्यातही अशीच परिस्थिती पहायला मिळत आहे. जिल्हा परिषदेची सत्ता टिकवण्यासह अध्यक्षपदाचा 'मुकुट' राखण्यासाठी भाजपत खल सुरू झाला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी शनिवारी विद्यमान अध्यक्षांच्या बंगल्यावर आपल्या सर्व सदस्यांची बैठक घेऊन बहुमताची चाचपणी केली.
राज्याच्या सत्ता संघर्षात सुरुवातीला अशक्य वाटणारी बाब महाविकास आघाडीच्या रुपाने शक्य झाली. यानंतर आता जिल्हा परिषदेत महाविकास आघाडी मोडून काढण्याचे आव्हान भाजप समोर आहे. जळगाव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा पहिल्या अडीच वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. त्यामुळे नवीन अध्यक्ष निवडीसाठी घडामोडी सुरू आहेत. जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर पहिल्या टप्प्यात भाजपने काँग्रेसच्या टेकूवर सत्ता प्रस्थापित केली होती. तेव्हा भाजपच्या सदस्या उज्ज्वला पाटील यांची अध्यक्षपदी वर्णी लागली होती.
हेही वाचा -केंद्रीय अर्थसंकल्पात प्राप्तिकरदात्यांना दिलासा मिळणार; अनुराग ठाकूर यांचे संकेत