जळगाव - कोविड रुग्णालयातील भोंगळ कारभाराविरुद्ध आंदोलन करताना जमावबंदी आणि साथरोग नियंत्रण कायद्याचे उल्लंघन झाले. त्यामुळे जळगाव शहरचे भाजप आमदार सुरेश भोळे, महापौर भारती सोनवणे यांच्यासह २२ जणांविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोविड रुग्णालयात केलेले आंदोलन या सर्वांच्या अंगलट आले आहे.
भुसावळ येथील एका ८२ वर्षीय कोरोनाबाधित बेपत्ता वृद्धेचा मृतदेह आठवडाभरानंतर कोविड रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक ७ मधील स्वच्छतागृहात आढळून आला होता. या घटनेमुळे रुग्णालय प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला. त्यानंतर सर्वच स्तरातून रुग्णालय प्रशासन आणि जिल्हाधिकाऱ्यांविषयी रोष व्यक्त केला गेला. भाजप आमदार सुरेश भोळे आणि महापौर भारती सोनवणे यांच्या नेतृत्त्वात भाजप नगरसेवक व कार्यकर्त्यांनी रुग्णालय अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांचे दालन गाठून निवेदन दिले. त्यानंतर या सर्वांनी रुग्णालयातच आंदोलन केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विना परवानगी गर्दी व आंदोलन करू नये, असे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असतानाही आंदोलकांनी कोणतीही परवानगी न घेता आंदोलन केले. त्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.