जळगाव -महापालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडीची सभा ही नगरसेवकांना सभागृहात उपस्थित राहूनच घेण्यात यावी, या मागणीसाठी भाजपने खंडपीठात धाव घेतली आहे. भाजपच्या दोन नगरसेवकांनी या संदर्भात खंडपीठात याचिका दाखल केली असून, त्यावर आज (बुधवारी) सुनावणी होण्याची शक्यता आहे.
महापौर व उपमहापौर निवडीच्या अनुषंगाने जळगावच्या राजकीय वर्तुळात प्रत्येक दिवशी जोरदार घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी भाजपचे २५ पेक्षा अधिक नगरसेवक बंडखोरी करत शिवसेनेच्या बाजूने झुकले आहेत. त्यामुळे भाजपच्या अडचणी वाढल्या असून, आता भाजपने शिवसेनेच्या वाटेत कायदेशीर अडथळा निर्माण करण्याचे प्रयत्न चालवले आहेत. महापौर व उपमहापौर निवडीची सभा ही ऑनलाईन पद्धतीने झाल्यास आपल्याला फटका बसू शकतो, ही शक्यता गृहीत धरून भाजपने आता मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली आहे. दरम्यान, आज खंडपीठात न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला आणि श्रीकांत कुलकर्णी यांच्या पिठासमोर याचिकेवर सुनावणी होणार आहे.
जळगाव महापालिकेसाठी वेगळा नियम का?
पिंपरी-चिंचवड व नागपूर महापालिकेप्रमाणेच जळगाव महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक ही ऑफलाईन पद्धतीने म्हणजेच सर्व नगरसेवकांना सभागृहात प्रत्यक्ष उपस्थित राहूनच घेण्यात यावी, अशी भाजपची मागणी आहे. याबाबतची याचिका भाजप नगरसेवक रंजना विजय सोनार व विश्वनाथ सुरेश खडके यांनी ऍड. अमरजितसिंग गिरासे यांच्यामार्फत खंडपीठात दाखल केली. पिंपरी-चिंचवड व नागपूर महापालिकेची निवडणूक ही ऑफलाईन पार पडलेली असताना जळगाव महापालिकेला वेगळा न्याय का? असे याचिककर्त्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, याच अर्थाची एक याचिका विभागीय महसूल आयुक्त यांच्याकडेही दाखल केली आहे.