महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सणासुदीत केळीचा गोडवा वाढला; तब्बल साडेचार महिन्यांनी मिळाला 1 हजार रुपयांचा दर

जिल्ह्यातील रावेर बाजार समितीत सोमवारी उच्चप्रतीच्या नवती केळीला प्रतिक्विंटल 1 हजार 50 रुपये दर (फरक 20 रुपये) मिळाला. तसेच कांदेबाग व पिलबाग केळीला 830 रुपये प्रतिक्विंटल (फरक 20 रुपये) असे 950 रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. फरकाची रक्कम समाविष्ट करता 1 हजार रुपयांपेक्षा जास्त दराचा टप्पा तब्बल साडेचार महिन्यांच्या मोठ्या कालखंडानंतर केळीने गाठला आहे

सणासुदीत केळीचा गोडवा वाढला; तब्बल साडेचार महिन्यांनी मिळाला 1 हजार रुपयांचा दर
सणासुदीत केळीचा गोडवा वाढला; तब्बल साडेचार महिन्यांनी मिळाला 1 हजार रुपयांचा दर

By

Published : Aug 24, 2020, 2:41 PM IST

जळगाव- सध्या व्रतवैकल्ये आणि सणासुदीचा काळ सुरू आहे. त्यामुळे केळीला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. याच कारणामुळे केळीचा गोडवा वाढला आहे. लॉकडाऊनच्या तब्बल साडेचार महिन्यांनंतर जळगावात केळीला 1 हजार रुपयांपेक्षा अधिक दर मिळाला आहे.

जिल्ह्यातील रावेर बाजार समितीत सोमवारी उच्चप्रतीच्या नवती केळीला प्रतिक्विंटल 1 हजार 50 रुपये दर (फरक 20 रुपये) मिळाला. तसेच कांदेबाग व पिलबाग केळीला 830 रुपये प्रतिक्विंटल (फरक 20 रुपये) असे 950 रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. फरकाची रक्कम समाविष्ट करता 1 हजार रुपयांपेक्षा जास्त दराचा टप्पा तब्बल साडेचार महिन्यांच्या मोठ्या कालखंडानंतर केळीने गाठला आहे. सोमवारी नवती केळीला 20 रुपयांच्या फरकासह 1 हजार 50 रुपये दर मिळाला. रावेर बोर्डाचे दर तसेच केळीला मागणी अधिक असली तरी शेतकऱ्यांकडून मात्र प्रतिक्विंटल 250 ते 300 रुपये कमी देऊन केळीची कापणी होत असल्याने केळी उत्पादक शेतकरी नाराज आहेत.

कोरोनामुळे असलेल्या लॉकडाऊनचा मोठा फटका केळी उत्पादकांना बसला आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केळीचे दर 1 हजार 70 रुपये होते. परंतु, एप्रिलच्या दुसऱ्याच आठवड्यात केळीचे दर सुमारे साडेचारशे रुपयांनी घसरले होते. तेव्हा केळीला प्रतिक्विंटल 600 रुपये एवढा दर मिळाला होता. यावेळी कांदेबाग व पिलबाग केळीच्या दरातही 500 रुपयांनी घट झाली होती. तेव्हापासून केळीचे दर 1 हजार रुपयांपेक्षा कमीच होते. मात्र सुमारे साडेचार महिन्यानंतर आता केळीचे दर वाढले आहेत.

व्यापाऱ्यांकडून अडवणूक होत असल्याच्या तक्रारी-

गेल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच, शनिवारी केळीला 920 रुपये प्रतिक्विंटल, 18 रुपयांच्या फरकासह 1 हजार 28 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले. त्यानंतर सोमवारी उच्चप्रतीच्या केळीच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. मागणी वाढल्याने आता केळीचे दर वाढत आहेत. दरम्यान, सध्या केळीला मोठी मागणी असतानाही व्यापाऱ्यांकडून पूर्ण भाव दिला जात नसल्याने केळी उत्पादक शेतकरी नाराज आहेत. बोर्डाच्या दरांपेक्षा 200 ते 300 रुपये प्रतिक्विंटल कमी दर दिले जात असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details