जळगाव - तालुक्यातील आसोदा येथील बहिणाबाई चौधरी सहकारी पतसंस्थेत ठेवीची मुदत संपल्यावर देखील रक्कम परत न देता, वेळोवेळी फसवणुक केल्याचा आरोप केला एका ज्येष्ठ ठेवीदाराने केला आहे. त्या ठेवीदाराने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पत्नीसह साखळी उपोषणाला सुरुवात केली.
संस्थेची रक्कम देण्यास टाळाटाळ -
जळगाव तालुक्यातील आसोदा येथील बहिणाबाई सहकारी चौधरी पतसंस्थेमध्ये आसोदा येथीलच ज्येष्ठ नागरिक वसंत दपाडू चौधरी यांनी 10 ते 12 लाखाची रक्कम फिक्स डिपॉझिट म्हणून ठेवली होती. या ठेवीची मुदत संपल्यावर पतसंस्थेकडे रक्कमेची मागणी केली. संस्थने रक्कम देण्यास टाळाटाळ केल्यानतंर उपनिबंधकाकडे अर्ज केला. मात्र, त्यांच्याकडून देखील मागणीची दखल घेण्यात आली नाही, अशी वसंत चौधरी यांची तक्रार आहे. पतसंस्थेकडून थकबाकीदारांच्या मिळकतीचा लिलाव करण्यात आला. या लिलावात चौधरी यांनी भाग घेवून सर्वोच्च बोली लावून ममुराबाद शिवारातील शेतजमीन घेतली. मात्र, त्यानंतरही जमीन नावावर करुन देण्यासाठी सुध्दा पतसंस्था हस्तक्षेप करुन टाळाटाळ करीत असल्याचाही आरोप तक्रारदार चौधरी यांनी जिल्हा उपनिबंधक यांना दिलेल्या निवेदनात केला आहे.