जळगाव- जळगावची विमानसेवा दीड वर्षापूर्वीच सुरू होऊन खंडित झाल्यानंतर हैद्राबादच्या ट्रू-जेट कंपनीला जळगावातून विमानसेवा देण्याची परवानगी देण्यात आली होती. ट्रू-जेट कंपनीकडून 'अहमदाबाद ते जळगाव' व 'जळगाव ते मुंबई' या दोन ठिकाणी विमानसेवा देणार आहे, परंतु ट्रू-जेटला नागरी विमानवाहतूक महासंचालनालयाकडून (DGCA) अद्यापही काही परवानग्या मिळालेल्या नाहीत. यामुळे ही विमानसेवा रखडण्याची शक्यता आहे.
जळगावची विमानसेवा रखडण्याची शक्यता १५ दिवसांपूर्वीच ट्रू-जेट कंपनीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी जळगावात येऊन उद्योजक, व्यापाऱ्यांची बैठक घेऊन कंपनीच्या योजनांची माहिती दिली होती. यावेळी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी १७ जुलैपासून 'अहमदाबाद-जळगाव-मुंबई' अशी विमानसेवा सुरू केली जाणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार कंपनीने जळगाव विमानतळावर १५ कर्मचाऱ्यांची नेमणूकदेखील केली होती.
या कर्मचाऱ्यांना हैद्राबाद येथे नेऊन त्यांना प्रशिक्षण देण्यात आले होते. ट्रू-जेट कंपनीच्या रचनेनुसार विमानतळावरील पूर्वीच्या विभागात फेरफार करण्यात आले आहेत. ट्रू-जेटने विमानतळावर संगणक कक्ष तयार केला असून, प्रशिक्षण घेतलेले विमानतळ व्यवस्थापक लवकरच जळगावात दाखल होणार आहेत. विमानात सामानाची चढ-उतार करणारा लोडर-अनलोडर स्टाफ या आधीच दाखल झाला आहे. विमानतळावर आवश्यक त्या सुविधादेखील करण्यात येत आहे. दुसरीकडे हैदराबाद येथे कंपनीच्या विमानांसाठी मार्गदेखील निर्माण करण्यात आला आहे.
जळगावची विमानसेवा रखडण्याची शक्यता दरम्यान नागरी विमानवाहतूक महासंचालनालय च्या परवानग्या वगळता इतर सर्व बाबींची पूर्तता ट्रू जेट कंपनीतर्फे करण्यात आली आहे व उरलेल्या परवानगी मिळवण्याची प्रक्रिया सुरू असून त्या प्राप्त झाल्यानंतर विमानसेवेची तारीख जाहीर करण्यात येईल. विमानसेवा सुरू होण्याबाबत कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे. विमानसेवा सुरू होणार म्हणून चर्चा चालली असतानाच अनेक अडचणी येत असल्याने जळगाव शहरातील नागरिक व व्यापारीवर्गातून नाराजी व्यक्त केली जात आहे.