महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगावच्या विमानसेवेची सुरुवात लांबणीवर; अहमदाबाद विमानतळावर जागा उपलब्ध नसल्याचे कारण - हैदराबाद

अहमदाबाद विमानतळाचे पुनर्निर्माणाचे काम सुरू असल्याने तेथे जागा उपलब्ध नसल्याचे ट्रु-जेट कंपनीला कळवण्यात आले आहे. त्यामुळे ट्रु-जेटतर्फे विमानसेवा सुरू करण्यात अडचणी आल्या आहेत. जळगावची विमानसेवा १ सप्टेंबरनंतर सुरू होण्याची शक्यता आहे.

जळगाव विमानतळ

By

Published : Jul 31, 2019, 4:27 PM IST

जळगाव- अहमदाबाद विमानतळावर पार्किंग स्लॉट उपलब्ध नसल्याने शहरातील खंडित झालेली विमानसेवा सुरू होण्यात पुन्हा एकदा अडचणी निर्माण झाल्या आहेत. १ ऑगस्टचा मुहूर्त हुकणार असल्याने विमानसेवा सुरु होणे लांबणीवर पडले आहे.

जळगाव विमानतळ

मागील दोन वर्षांपूर्वी एअर डेक्कन चार्टर्स सर्व्हिसेस या कंपनीतर्फे पंतप्रधानांच्या महत्त्वाकांक्षी उडान योजनेच्या पहिल्या टप्प्यात जळगाव-मुंबई अशी विमानसेवा सुरू करण्यात आली. मात्र, अवघ्या काही महिन्यांतच ही सेवा खंडित झाली. तेव्हापासून जळगावातून विमानसेवा बंद आहे. ती पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हैदराबाद येथील ट्रु-जेट या कंपनीला दुसऱ्या टप्प्यातील विमान सेवेला परवानगी मिळाली आहे. ट्रु-जेट कंपनीतर्फे अहमदाबाद-जळगाव व जळगाव-मुंबई अशी आठवड्यातून सहा दिवस विमानसेवा पुरवण्यात येणार आहे.

विमानसेवा सुरू करण्यासाठी कंपनीतर्फे १५ जणांचा स्टाफ नियुक्त करण्यात आला असून त्यांना हैदराबाद येथील मुख्यालयात प्रशिक्षणही देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे कंपनीतर्फे जळगाव विमानतळावर संगणक कक्ष, तिकीट खिडकी आदी सुविधा सुरु करण्यात आल्या आहेत. गेल्या पंधरा दिवसात कंपनीला नागरी उड्डयन मंत्रालयाकडून सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक ते परवाने प्राप्त झाले आहेत.

कंपनीला विमान पार्किंगसाठी अहमदाबाद विमानतळावर जागा हवी आहे. त्यासाठी कंपनीतर्फे अहमदाबाद विमानतळ संचालकांना रितसर पत्रही दिले आहे. मात्र, अहमदाबाद विमानतळाचे पुनर्निर्माणाचे काम सुरू असल्याने तेथे जागा उपलब्ध नसल्याचे कंपनीला कळवण्यात आले आहे. त्यामुळे ट्रु-जेटतर्फे विमानसेवा सुरू करण्यात अडचणी आल्या आहेत. दरम्यान, १ ऑगस्टला सुरू होणारी विमानसेवा आता पुढील महिन्यात म्हणजे १ सप्टेंबरनंतर सुरू होण्याची शक्यता आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details