जळगाव - कृषी उत्पन्न बाजार समिती महासंघाच्या आदेशाने शुक्रवारी पुकारण्यात आलेल्या एकदिवसीय लाक्षणिक संपामुळे जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत लाखोंचे व्यवहार ठप्प झाले. केंद्र सरकारने ५ जुन २०२० ला काढलेल्या बाजार समिती नियमन मुक्ती आदेशाविराेधात कृषी उत्पन्न बाजार समिती महासंघाने एक दिवसाच्या लाक्षणिक संपाची हाक दिली होती. या संपात जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीसह जिल्ह्यातील सर्वच बाजार समितींचा सहभाग होता.
केंद्र सरकारने काढलेल्या अध्यादेशामुळे कृषी उत्पन्न बाजार समित्या नियमनमुक्त झालेल्या आहेत. त्यामुळे शेतकरी बाजार समित्यांच्या बाहेर देशात काेठेही त्यांचा शेतमाल विक्री करू शकताे. दरम्यान, या निर्णयामुळे कृषी उत्पन्न बाजार समित्यांना बाजार समितीच्या बाहेर झालेल्या शेतमाल खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून मार्केट फी मिळणार नाही. बाजार समितीमध्ये शेतकरी, व्यापारी, अडते, हमाल-मापाडी या सर्वांवर समितीचे नियंत्रण असल्याने शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी याेग्य भाव, पैसे मिळण्याची हमी मिळत असते. तसेच शेतकऱ्यांना अनेक सुविधा दिल्या जातात.