जळगाव -राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत संयुक्त सक्रिय क्षयरुग्ण व कुष्ठरुग्ण शोध अभियान 1 ते 16 डिसेंबर, 2020 या कालावधीत राबवण्यात येत आहे. कुष्ठरोग व क्षयरोग कार्यक्रम हा शासन, जिल्हा परिषद, महानगर पालिका व स्वयंसेवी संस्था यांच्या समन्वयाने राबविण्यात येत आहे. जळगाव जिल्ह्यातील 15 तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागाचे सर्वेक्षण या अभियानात करण्यात येत आहे.
समाजात लपून राहिलेले कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोधून त्यांना बरे करून समाजातील संसर्गाची साखळी खंडीत करणे, क्षयरोग व कुष्ठरोग निर्मुलनाच्या दिशेने प्रयत्न करणे, हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. या मोहिमेत एक पुरुष व एक स्त्री, असे एक पथक असून ग्रामीण भागात प्रत्येक दिवशी 20 घरे व शहरी भागात 25 घरांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. जळगाव जिल्ह्यातील एकूण 43 लाख 69 हजार 966 लोकसंख्येपैकी 33 लाख 37 हजार 292 लोकसंख्येच्या सर्वेक्षणाकरीता एकूण 2 हजार 972 पथके व 630 पर्यवेक्षकांची निवड करण्यात आली आहे.
आदिवासी भागात 100 टक्के तपासणी
तपासणीसाठी येणाऱ्या पथकांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे. क्षयरोग व कुष्ठरोग शोध अभियान 2020-21 मध्ये जास्तीत जास्त कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोधून त्यांना उपचाराखाली आणून समाजातील योग्य संसर्गजन्य कुष्ठरुग्णांचे व क्षयरुग्णांचे प्रमाण कमी होण्यासाठी मोहिमेमध्ये तपासणीसाठी येणाऱ्या पथकाकडून तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन. पाटील यांनी केले.