जळगाव - घरगुती जेवणाचे डबे पुरवणाऱ्या जळगावातील एका व्यावसायिकाला बिहार राज्यातील काही ठगांनी साडेतीन लाख रुपयांचा चुना लावला आहे. सेवाभावी संस्थेत पैसे गुंतवल्यानंतर तीन महिन्यात ते दामदुप्पट करण्याचे आमिष या ठगांनी व्यावसायिकाला दिले होते. धक्कादायक बाब म्हणजे, पैसे घेऊन संबंधित इच्छुक व्यावसायिकाला बिहारमध्ये बोलावण्यात आले होते. पैसे घेऊन व्यावसायिक त्याच्या आईसह बिहार राज्यातील मुजफ्फरपूरला गेल्यानंतर त्यांनी त्याच्याकडून पैशांची बॅग हिसकावून पोबारा केला.
मनोज शोभाराम भाटी (वय 37) असे फसवणूक झालेल्या व्यावसायिकाचे नाव असून, तो जळगाव शहराजवळ असलेल्या कुसुंबा येथील रहिवासी आहे. हा सारा प्रकार मागील आठवड्यात बिहार राज्यातील मुजफ्फरपूर, पटना याठिकाणी घडला आहे. या घटनेसंदर्भात मनोजने दिलेल्या माहितीनुसार, दीड वर्षांपूर्वी त्याचे बिहार राज्यातील एका तरुणीसोबत लग्न झालेले होते. मात्र, लग्नानंतर संबंधित तरुणीने त्याची फसवणूक केली. लग्नात मनोजची ओळख भीमराज सिंह नावाच्या एका मध्यमवयीन व्यक्तीसोबत झालेली होती. भीमराज सिंह हा बिहारमध्ये उत्क्रमित विद्यालय नावाच्या शाळेत शिक्षक आहे. लग्नानंतर भीमराज सिंह हा मनोजच्या संपर्कात होता. त्याने दीड महिन्यांपूर्वी मनोजचा विश्वास संपादन करून आर्थिक लाभाची एक योजना सांगितली होती. पटना येथे सेवा सदन नावाची आमची एक सेवाभावी संस्था असून, ही संस्था गोरगरिबांच्या हितासाठी काम करते. या संस्थेमार्फत एका प्रकल्पात पैसे गुंतवले की तीन महिन्यात गुंतवणूकदाराला गुंतवणूक केलेल्या रकमेच्या दामदुप्पट मोबदला परत मिळतो. विशेष म्हणजे, गुंतवणूकदाराला त्याच्या पैशांची खात्री म्हणून व्यवसायासाठी पेपर कप बनवण्याचे मशीन दिले जाते. तीन महिने पूर्ण झाल्यानंतर दामदुप्पट रक्कम आणि ही मशीन गुंतवणूकदाराला मिळते. हीच मशीन दिल्ली, आग्रा याठिकाणी 12 ते 15 लाख रुपयांची मिळते. त्यामुळे या योजनेत सहभागी व्हायला हरकत नाही, असे आमिष भीमराज सिंह याने मनोजला दिले होते. यावर विश्वास ठेऊन मनोज आमिषाला बळी पडला.
नेमकं काय घडलं?
भीमराज सिंह मोबाईलवरून सतत मनोजच्या संपर्कात होता. त्याने पैशांचे दामदुप्पट करून देण्याचे आमिष दाखवले होते. तो मनोजला योजनेत सहभागी होण्याबाबत सतत आग्रह करत होता. शेवटी मनोज तयार झाल्यानंतर त्याला साडेतीन लाख रुपये घेऊन मुजफ्फरपूरला बोलावण्यात आले. मागील आठवड्यात मनोज त्याच्या आईला सोबत घेऊन बिहारमध्ये गेला. मनोजने एक लाख रुपयांची रोकड सोबत नेली होती. ते दोघे मुजफ्फरपूरला पोहचल्यानंतर भीमराज सिंह व त्याच्या साथीदारांनी त्यांना एका हॉटेलात मुक्कामी थांबवले. या दरम्यान दोन दिवसात मनोजने त्याच्या आईच्या बँक खात्यातून एटीएममधून अडीच लाख रुपये काढले. साडेतीन लाख रुपये जमल्यानंतर मनोजने पेपर कप मशीनबाबत भीमराजला विचारणा केली. मशीन घेण्यासाठी पटना जावे लागेल, म्हणून तो मनोजला एका कारने घेऊन निघाला. वाटेत एका निर्जनस्थळी कार थांबवून गाडीतील चौघांनी मनोजला मारहाण करत पैशांची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर मनोजने कारमधून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. गाडीतील भामट्यांनी त्याचा पाठलाग केला. त्याचवेळी रस्त्यात पोलिसांच्या वेशात दोन जण समोर आले. त्यांच्याकडे मदतीची याचना केल्यानंतर पाठलाग करणाऱ्यांना त्यांनी अडवले. 'तुम्ही भामटे आहात, एका सर्वसामान्य व्यक्तीची तुम्ही फसवणूक करत आहात, तुम्हाला पोलीस ठाण्यात घेऊन जायचे आहे', म्हणून ते सर्व जण एका रिक्षात बसायला लागले. तेव्हा मनोजने मी पण सोबत येतो, असे सांगितल्यानंतर त्यांनी त्याला धक्का मारून पलायन केले. पोलीस वेशात असलेले दोघे पण ठगांचे साथीदार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मनोजने स्थानिक पोलीस ठाण्यात धाव घेतली.
गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ
या प्रकरणी बिहारच्या स्थानिक पोलिसांनी सुरुवातीला मनोजच्या फसवणुकीबाबत गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली. म्हणून मनोजने तेथील काही प्रसारमाध्यमांशी संपर्क करून आपल्यासोबत घडलेली हकीकत सांगितली. माध्यमांनी फसवणुकीबाबत वृत्त प्रकाशित केल्यानंतर पोलीस प्रशासन जागे झाले. नंतर मनोजची तक्रार नोंदवली गेली. फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर मनोज आणि त्याची आई 2 दिवसांपूर्वी जळगावात परतले. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर मनोजसोबत घडलेल्या प्रकाराची पोलिसांनी प्राथमिक चौकशी केली. तो मुक्कामी थांबलेल्या हॉटेलातील सीसीटीव्ही फुटेज, भामट्यांचे मोबाईल कॉल डिटेल्स काढण्यात आले. त्यात संबंधित ठग हे मनोजची लग्नाबाबत फसवणूक करणाऱ्या तरुणीच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे. या गुन्ह्यात ती तरुणीदेखील सहआरोपी असण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :गायब झालेल्या श्वानाच्या शोधासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासले अन् धक्काच बसला...