जळगाव - बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराज यांच्या 280 व्या जयंतीनिमित्त जिल्ह्यातील जामनेर शहरात 'संत सेवालाल महाराज जयंती महोत्सव' आयोजित करण्यात आला होता. रविवारी बंजारा समाजबांधवांकडून एकतेचे दर्शन घडले. जामनेर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात पार पडलेल्या या मेळाव्यास जिल्ह्यातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जामनेर : संत सेवालाल महाराज जयंती उत्साहात; बंजारा समाजाकडून एकतेचे दर्शन - unity
बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराज यांच्या 280 व्या जयंतीनिमित्त जिल्ह्यातील जामनेर शहरात 'संत सेवालाल महाराज जयंती महोत्सव' आयोजित करण्यात आला होता.
या मेळाव्यात बंजारा समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. विधानपरिषदेचे आमदार हरिभाऊ राठोड यांनी मेळाव्याला उपस्थित समाजबांधवांना मार्गदर्शन केले. अशा प्रकारच्या मेळाव्यातून समाजाचे संघटन होत आहे, समाज एकवटतोय ही चांगली बाब आहे. समाजाच्या ताकदीची जाणीव होत आहे. त्यामुळे समाजावरील राजकीय, सामाजिक अन्याय दूर होण्यास मदत होईल, असा विश्वास आमदार राठोड यांनी व्यक्त केला.
मेळाव्यापूर्वी शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेने शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले. शोभायात्रेत सहभागी झालेल्या समाजबांधवांनी संत सेवालाल महाराज यांच्या नावाचा जयघोष केला.
या मेळाव्यास विधानपरिषदेचे आमदार हरिभाऊ राठोड, राष्ट्रीय बंजारा टायगर संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मदन जाधव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय राठोड, आत्माराम जाधव, कांतीलाल नाईक, सुनीता राठोड, नंदा मथुरे, राजीव राठोड, ओंकार जाधव, अशोक चव्हाण, राजेश नाईक, लालचंद चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.