जळगाव- भाजप-सेना युती सरकारच्या काळात घेण्यात आलेल्या अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांच्या पडताळणीचा धडाका उद्धव ठाकरे सरकारने लगावला आहे. सरकारच्या या कृतीमुळे राज्याच्या विकासाला खीळ बसण्याचा धोका आहे. राज्याच्या विकासाचा वेग मंदावणे या सरकारला परवडणारे नाही, अशा शब्दांत भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले.
हेही वाचा -परतीचा पावसाचा फळांना फटका; पेरूंच्या झाडांना रोगराईने वेढले, खराब होण्याच्या मार्गावर
भाजपच्यावतीने आज (शनिवार) जळगावात उत्तर महाराष्ट्र कोअर कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला विखे पाटील उपस्थित होते. याप्रसंगी पत्रकारांशी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे सरकारच्या निर्णय प्रक्रियेला लक्ष्य केले. विखे पाटील पुढे म्हणाले, आज तुम्ही ज्या सरकारचे मुख्यमंत्री पद भूषवत आहात; त्यातील बहुतांश मंत्री युती सरकारमध्येही होतेच. तेव्हाच्या निर्णय प्रक्रियेत त्यांनीही सहभाग घेतला होता. तेव्हा योग्य वाटणारे निर्णय तुम्हाला आज का अयोग्य वाटत आहेत, हे कळायला मार्ग नाही. काही निर्णयांचे पुनर्विलोकन ठिक आहे. तुमचे सहकारी पक्ष आग्रह करत असतील तर ते निश्चित व्हायला हवे. परंतु, मित्र पक्षांचा आग्रह किती मान्य करायचा, हे कळायला हवे. कारण शेवटी तुम्ही त्यावेळी निर्णय प्रक्रियेत होते, हे लक्षात ठेवावे. पुढे जाऊन तुम्हाला जनतेला स्पष्टीकरण द्यावं लागणार आहे. शेवटी काही ठराविक निर्णय स्थगित होत आहेत, म्हणजे ते आकसबुद्धीने होत आहेत, असा आरोपही विखे-पाटील यांनी केला.