जळगाव -जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे चारही पक्ष सर्वपक्षीय पॅनलच्या माध्यमातून लढणार असल्याचे आता जवळपास निश्चित झाले आहे. चारही पक्षांनी आपापल्या ताकदीनुसार जागा पदरात पाडून घेतल्या आहेत. आज झालेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या कोअर कमिटीच्या बैठकीत जागा वाटपाच्या सूत्रावर अंतिम चर्चा झाली. याबाबतची माहिती पक्षश्रेष्ठींना देऊन उद्या (रविवारी) जागा वाटपाच्या सूत्रावर अधिकृत शिक्कामोर्तब होणार आहे. त्यानंतरच कोणत्या पक्षाच्या वाट्याला कोणत्या तालुक्याची जागा व मतदारसंघ आला आहे, हे स्पष्ट होणार आहे.
जिल्हा बँकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने मोर्चेबांधणीला वेग आला आहे. शनिवारी सायंकाळी अजिंठा शासकीय विश्रामगृहात सर्वपक्षीय नेत्यांचा समावेश असलेल्या कोअर कमिटीची बैठक झाली. बैठकीला पालकमंत्री गुलाबराव पाटील, भाजप नेते आमदार गिरीश महाजन, माजी मंत्री गुलाबराव देवकर, आमदार चिमणराव पाटील, सुरेश भोळे, शिरीष चौधरी, माजी आमदार डॉ. सतीश पाटील, प्रा. चंद्रकांत सोनवणे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार आदींची उपस्थिती होती.
..असे आहे जागा वाटपाचे सूत्र
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी बैठकीनंतर माध्यमांना जागा वाटपाच्या सूत्राची माहिती दिली. ते म्हणाले की, जिल्हा बँकेच्या निकडणुकीत राजकारण नको म्हणून सर्वपक्षीय पॅनलचा पर्याय पुढे ठेवण्यात आला. त्याला चारही पक्षांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. पक्षनिहाय ताकद लक्षात घेता यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपच्या वाट्याला प्रत्येकी 7, शिवसेनेला 5 आणि काँग्रेसला 2 जागा सोडण्यात आल्या आहेत. याबाबत आजच्या बैठकीत सर्वांचे एकमत झाले आहे. आता प्रत्येक पक्षाकडून आपापल्या नेत्यांना जागांची माहिती दिली जाईल. त्यानंतर उद्या जागा वाटपाच्या सूत्रावर शिक्कामोर्तब होऊन अधिकृत घोषणा केली जाईल, असे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.