जळगाव - सध्या जगभरात कोरोना विषाणूचे थैमान सुरू असल्याने जागतिक बाजारपेठ अनिश्चिततेच्या फेऱ्यात अडकली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना सोने-चांदीची बाजारपेठ खुणावत आहे. या कारणांमुळेच सध्या सोने-चांदीच्या दरात चढ-उतार सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. सोन्यासाठी प्रसिद्ध असलेल्या जळगावात सोन्याचे दर 43 हजार 500 रुपये प्रतितोळा तर चांदीचे दर 46 ते 46 हजार 500 रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहचले आहेत.
जागतिक बाजारपेठेतील अस्थिरतेमुळे सोन्याचे दर दिवसेंदिवस नव्या विक्रमावर पोहचत आहेत. जळगावात सोने 44 हजार रुपये प्रतितोळ्याच्या उंबरठ्यावर आहे. 4 मार्चला सोन्याचे दर एकाच दिवशी 1 हजार 300 रुपयांनी वधारून 43 हजार 800 रुपयांवर गेले होते. चांदीचे दरही दिवशी 700 रुपयांनी वाढले होते. सोने-चांदीच्या दरात चढ-उतार सुरू असल्याने व्यापाऱ्यांचे अंदाज चुकत आहेत. दरम्यान, सोने आणि चांदीचे दर सतत वाढत असल्याने सर्वसामान्यांना सोने-चांदी खरेदी करणे जवळपास अशक्य झाले आहे.