जळगाव -केंद्र सरकारने केळी पीक विम्याच्या प्रीमियमची आपल्या हिश्याची रक्कम 50 टक्क्यांवरून 12.5 टक्के केली आहे. उर्वरित रकमेचा भार राज्य सरकारच्या खांद्यावर टाकला आहे. एवढा हिस्सा भरणे राज्य सरकारला शक्य नाही. केळी पीक विम्याचे असे अन्यायकारक नवे धोरण केंद्राने केल्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्यात अडचणी आहेत, असा आरोप राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी केला.
मालेगाव येथून जळगावमार्गे अकोला जात असताना कृषिमंत्री दादा भुसेंनी जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयातून कॅबिनेटच्या बैठकीला ऑनलाइन पद्धतीने हजेरी लावली. ही बैठक आटोपल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. यावेळी भुसे यांच्यासोबत जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे देखील उपस्थित होते.
केंद्राकडे दाखवले बोट -
केळी पीक विम्याच्या मुद्यावरून राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून राज्य सरकारला सातत्याने लक्ष्य केले जात आहे. असे असताना आज जळगावात कृषिमंत्री दादा भुसेंनी केळी पीक विम्याच्या बाबतीत वस्तुस्थिती स्पष्ट करताना केंद्र सरकारकडे बोट दाखवले.
भुसे यांनी सांगितले की, राज्यात भाजपचे सरकार असताना मागील वर्षी पीक विमा योजना राबवण्यासाठी 6 वेळा निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. परंतु, तिला प्रतिसाद मिळाला नाही, म्हणून या योजनेतील काही निकष बदलण्यात आले. नंतर केंद्र सरकारने पीक विम्याबाबत नवे धोरण जाहीर केले. त्यात पीक विमा शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक करत, विमा घोषित झाल्यावर तो पुढचे 3 वर्षे देण्याचा निर्णय घेतला. या शिवाय केंद्राने त्यावेळी राज्य सरकार आणि शेतकऱ्यांवर अन्याय करणारे एक धोरण आखले. ज्यात केंद्राने पीक विम्याच्या प्रीमियमचा आपला हिस्सा 50 टक्क्यांवरून 12.5 इतका केला.