जळगाव - कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी मार्च महिन्यात शेवटच्या आठवड्यापासून देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. लॉकडाऊनमुळे औद्योगिक क्षेत्राला सर्वात जास्त फटका बसला. मालाचे उत्पादन, ट्रान्सपोर्टेशन असे सर्व काही ठप्प झाल्याने औद्योगिक क्षेत्राचे अर्थकारणच मोडीत निघाले. जळगावातील औद्योगिक क्षेत्रही त्याला अपवाद नाही. लॉकडाऊनमुळे येथील औद्योगिक क्षेत्रावर मोठा परिणाम झाला. कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली. मात्र, आता 'मिशन बिगीन'चा नारा देत राज्य शासनाने प्रत्येक क्षेत्राला शिथिलता देण्यास सुरुवात केल्याने औद्योगिक क्षेत्राची विस्कटलेली घडी हळूहळू पूर्वपदावर येत आहे. येथील 600 ते 700 लहान-मोठ्या उद्योगांची चाके पुन्हा फिरू लागली असून, कामगारांच्या हाताला काम मिळाले आहे. आता उत्पादन वाढीवर उद्योजकांचा भर आहे. अशीच परिस्थिती कायम राहिली तर डिसेंबरपर्यंत औद्योगिक क्षेत्राची गाडी रुळावर येईल, अशी आशा आहे.
जळगाव शहरात औरंगाबाद महामार्गावर विस्तीर्ण क्षेत्रावर औद्योगिक वसाहत आहे. या ठिकाणी प्लास्टिक पाईप, ठिबक सिंचन साहित्य, चटई, पेपर निर्मिती, दाळमिल, तेल निर्मिती करणारे लहान-मोठे असे 600 ते 700 उद्योग आहेत. लॉकडाऊननंतरचे अडीच ते तीन महिने येथील कृषीपूरक तसेच अन्नपदार्थ निर्मिती करणारे उद्योग सोडले तर इतर उद्योग बंद होते. एका उद्योगाची महिनाभराची उलाढाल 10 ते 15 लाख रुपये गृहीत धरली तर या काळात ३५० ते ४०० कोटी रुपयांचे उत्पादन ठप्प झाले होते. लॉकडाऊनपूर्वी उत्पादित झालेला कोट्यवधी रुपयांचा माल बाजारपेठेत जाऊ शकला नाही. त्यामुळे लहान-मोठ्या उद्योजकांचे कोट्यवधी रुपयांचे अर्थकारण थांबले.
ट्रान्सपोर्टेशन(वाहतूक) सुरळीत झाल्याने आली गती -
लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर सर्वात जास्त अडचणी मालाच्या ट्रान्सपोर्टेशनमध्ये आल्या. राज्यात जिल्हाबंदी असल्याने मालाच्या वाहतुकीसाठी शासनाने पासेस बंधनकारक केले होते. याशिवाय प्रत्येक जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या तपासणी नाक्यांवर अडचणी येत होत्या. त्यामुळे वाहतूकदार उद्योजकांना प्रतिसाद देत नव्हते. अनेक उद्योजकांनी लॉकडाऊनपूर्वी उत्पादित झालेला माल गोदामांमध्ये ठेवणेच पसंत केले. माल बाजारपेठेत न गेल्याने त्यांची देणीही अडकली. पर्यायाने अर्थकारणावर परिणाम झाला. आता मात्र, ट्रान्सपोर्टेशन सुरळीत झाल्याने औद्योगिक क्षेत्राला गती येऊ लागली आहे, अशी माहिती जळगावातील 'जिंदा' संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
कामगार परतले, उत्पादनाचा वेग वाढला -