जळगाव- आपला शेजारी देश असलेला पाकिस्तानच्या सातत्याने कुरापत्या सुरूच आहेत. पाकिस्तानने आपल्या कुरापत्या थांबवाव्यात म्हणून भारताने सामोपचाराने, शांततेने, बंधुप्रेमाचे सर्व प्रयत्न केले. परंतु, पाकिस्तानच्या कुरापत्या काही थांबलेल्या नाहीत. भारताने पाकिस्तानच्या कुरापत्यांना वेळोवेळी समर्थपणे प्रत्युत्तरही दिले आहे. यापूर्वी भारताने दोन वेळा सर्जिकल स्ट्राईक केले आहेत. पाकिस्तानने आपल्या कुरापत्या थांबवल्या नाहीत तर भारताकडून पाकिस्तानवर लवकरच तिसरा सर्जिकल स्ट्राईक केला जाईल, अशी खळबळजनक माहिती भाजपचे माजी संरक्षण राज्यमंत्री तथा खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी दिली आहे.
पाकिस्तानवर लवकरच तिसरा 'सर्जिकल स्ट्राईक'; भाजपचे नेते सुभाष भामरेंची माहिती - भारत पाक सीमावाद
भारत पाक सीमेवर सध्या तणावाचे वातावरण सुरू आहे. त्यावरून भाजपचे माजी केंद्रीय मंत्री सुभाष भामरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भारत लवकरच पाकिस्तानला प्रत्युत्तर देईल अशी माहिती भामरे यांनी दिली आहे. यावेळी भामरे यांनी महाविकास आघाडीच्या वर्षपूर्तीवरून ही टीका केली आहे. हे सरकार सर्वच स्तरावर अपयशी ठरले आहे. सध्या राज्याची अवस्था बिकट झाली असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाले आहे. या वर्षभराच्या कार्यकाळात महाविकास आघाडी सरकारने जनहिताचे कोणत्याही प्रकारचे निर्णय घेतले नसल्याचा आरोप करत भाजपकडून विरोधी पक्ष म्हणून भूमिका मांडली जात आहे. याच अनुषंगाने खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी रविवारी दुपारी जळगावात पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार सुरेश भोळे, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, प्रसिद्धी प्रमुख मनोज भांडारकर उपस्थित होते.
महिला, युवती असुरक्षित-
राज्यातील महिला व युवती असुरक्षित आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात महिला अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. परंतु, राज्य सरकारला कोणत्याही प्रकारचे गांभीर्य नाही, अशी टीकाही डॉ. भामरेंनी यावेळी केली.