जळगाव -कोरोनावर उपाय म्हणून कोविशील्ड व कोव्हॅक्सिन लशीची निर्मिती झाली आहे. जळगाव जिल्ह्यासाठी पहिल्या टप्प्यात 24 हजार 320 कोरोना लसींचा साठा बुधवारी (दि. 13 जाने.) सायंकाळी नाशिक येथून प्राप्त झाला. प्रथम आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना लसीकरण होणार आहे.
जिल्ह्यात 16 जानेवारीपासून कोविड लसीकरणास सुरुवात होणार आहे. सुरुवातीस 9 केंद्रांवर लस देण्यात येतील. गेल्या 8 जानेवारीस कोविड लसीकरणाची रंगीत तालिमही झाली आहे. 100 जणांवर जिल्ह्यात 4 ठिकाणी रंगीत तालिम झाली होती. लसीकरणाबाबत काल (मंगळवारी) 9 केंद्रावरील लसीकरणासाठी नेमलेल्या कर्मचाऱ्यांना जिल्हा रुग्णालयात प्रशिक्षण देण्यात आले. बुधवारी दुपारी जिल्हा रुग्णालयात लसीकरणाबाबत मार्गदर्शनासाठी आरोग्य विभागातर्फे व्ही.सी. झाली. त्यात जळगावमधून जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद सहभागी झाले होते.
9 केंद्रांवर होणार लसीकरण
जिल्ह्यात अगोदर आरोग्य क्षेत्रातील 14 हजार कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात येणार आहेत. नंतर पोलीस, महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात येईल. 16 जानेवारी रोजी जामनेर, मुक्ताईनगर, चोपडा या तीन उपजिल्हा रुग्णालयात, भुसावळ, चाळीसगाव, पारोळा या तीन ग्रामीण रुग्णालयात तर जळगाव शहरातील जिल्हा रुग्णालय, नानीबाई अग्रवाल रुग्णालय (पंचमुखी हनुमान मंदिरामागे), भिकमचंद जैन रुग्णालय (शिवाजीनगर, जळगाव) असे एकूण 9 केंद्रावर लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली आहे.