जळगाव -पाचोरा तालुक्यातील सारोळा येथे एक अनोखा विवाह सोहळा पार पडला. येथे एका मुलीने तिच्या लग्नात आपल्या वडिलांचा पुतळा तयार केला व त्यासमोरच सात फेरे घेवून त्यांच्या आशीर्वाद घेतला आहे. वडिलांचा पुतळा तयार करून तिने त्यांची कमतरता दूर करण्याचा प्रयत्न केला. या अनोख्या लग्न सोहळ्याची आता राज्यभरात चर्चा सुरू आहे.
हेही वाचा -Maha Vikas aghadi : आगामी सर्व निवडणुकाही महाविकास आघाडी एकत्रच लढवणार - गुलाबराव पाटील
पाचोरा तालुक्यातील नांद्रा येथील माजी सैनिक भागवत धोंडू पाटील यांच्या पत्नी मंगला आणि 4 मुली पूनम, भाग्यश्री, प्रियंका व शुभांगी असा परिवार आहे. भागवत पाटील यांनी लष्करात कर्तव्य बजावून देशसेवा केली. १९९७ मध्ये सेवेतून निवृत्त झाले. या काळात मात्र मुलींकडे त्यांचे दुर्लक्ष झाले नाही. त्यांनी मुलींना वाढविण्यात त्यांच्या पालनपोषणात कुठलीच कमी ठेवली नाही. पूनमने पदवी घेतली, भाग्यश्रीने एमएबीएड, तर प्रियंका ही शिक्षण पूर्ण करून वनविभागात अधिकारी झाली. लहान मुलगी शुभांगी आता एमकॉम करत आहे. पूनम व भाग्यश्री यांचा विवाह सोहळाही भागवत पाटील यांनी थाटात पार पाडला. तिसर्या क्रमांकाची मुलगी प्रियंका हिचेही लग्न ठरले. तिचा सोहळाही मनाप्रमाणे थाटामाटात पार पाडायचा, असे त्यांचे ठरले होते. मात्र, नंतर एक दुखद घटना घडली. ५ ऑगस्ट २०२० मध्ये भागवत पाटील यांचे कोरोनाने निधन झाले आणि कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला. चारही मुलींचे पितृछत्र हरविले.