जळगाव -शेतात काम करत असणाऱ्या शेतकरी दाम्पत्यावर पट्टेदार वाघाने हल्ला केला. हल्ल्यात पती-पत्नी जखमी झाले असून त्यांना जळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. ही घटना रविवारी दुपारी पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर परिसरात ही घटना घडली.
जळगावात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी दाम्पत्य गंभीर जखमी - civil hospital jalgaon
शेतात काम करत असणाऱ्या भारत चव्हाण आणि मनिषा चव्हाण यांच्यावर वाघाने हल्ला केला. दोघांनीही झुंज देत हल्ला परतवून लावला. दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे.
भारत चव्हाण (३०) आणि मनिषा चव्हाण (२३) असे जखमी दाम्पत्याचे नाव असून वरसाडे तांड्यातील रहिवासी आहेत. रविवारी दुपारी ते नेहमीप्रमाणे शेतात काम करत असताना पट्टेदार वाघाने त्यांच्यावर अचानक प्राणघातक हल्ला केला. सुरुवातीला मनिषा यांच्यावर वाघाने हल्ला केला. त्यामुळे पत्नीला वाचवण्यासाठी भारत पुढे गेल्यावर त्यांच्या हाताला वाघाने चावा घेतला. मोठ्या हिंमतीने या दोघांनी वाघाचा हल्ला परतवून लावला. आजूबाजूचे काही लोक दोघा पती-पत्नीच्या मदतीला धावून आल्याने ते या जीवघेण्या प्रसंगातून बचावले.
दरम्यान, जखमी झालेल्या दोघांवर सुरुवातीला प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करण्यात आले. मात्र, जखम मोठी असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल केले. जखमी झालेल्या दोघा पती-पत्नीची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.