महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगाव जिल्ह्यात दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पसंतीचे महाविद्यालय निवडताना लागणार कस - College Admission Jalgaon

जिल्ह्यातील २१८ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठीची प्रक्रिया सुरू झाली आहे. यावर्षी कला, विज्ञान आणि वाणिज्य अशा तीनही शाखा मिळून एकूण ४९ हजार ८० जागा आहेत. मात्र, दुसरीकडे यावर्षी दहावीत ५८ हजारांच्यावर विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे, चांगले महाविद्यालय मिळण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये चांगलीच स्पर्धा असणार आहे.

Eleventh Admission Process Jalgaon
विज्ञान प्रवेश जळगाव

By

Published : Aug 21, 2021, 10:21 PM IST

जळगाव -जिल्ह्यातील २१८ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठीची प्रक्रिया सुरू झाली आहे. यावर्षी कला, विज्ञान आणि वाणिज्य अशा तीनही शाखा मिळून एकूण ४९ हजार ८० जागा आहेत. मात्र, दुसरीकडे यावर्षी दहावीत ५८ हजारांच्यावर विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे, चांगले महाविद्यालय मिळण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये चांगलीच स्पर्धा असणार आहे. अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत ऑनलाइन व ऑफलाइन असे दोन्ही पर्याय विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत.

हेही वाचा -महर्षी वाल्मिकींशी तालिबानींची तुलना: जळगावात शायर मुनव्वर राणा विरोधात गुन्हा दाखल

कोरोनामुळे यावर्षी दहावीची परीक्षा होऊ शकली नाही. त्यामुळे, मुल्यमापन पद्धतीनुसार निकाल जाहीर झाला. निकाल जाहीर झाल्यानंतर अकरावीच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेण्याचे शिक्षण विभागाचे नियोजन होते. परंतु, कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव सीईटी परीक्षा रद्द झाली आणि प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. विद्यार्थ्यांना २४ ऑगस्टपर्यंत प्रवेशाचे अर्ज महाविद्यालयात भरता येणार आहे.

विज्ञान शाखेकडे अधिक कल

अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी जिल्ह्यातील सर्वच महाविद्यालयांकडून संपूर्ण तयारी झाली आहे. ऑनलाइन व ऑफलाइन अशा पद्धतीने महाविद्यालयांकडून प्रवेशाची प्रक्रिया राबवली जाणार आहे. हजारोंच्या संख्येने विद्यार्थी विविध महाविद्यालयांमध्ये प्रत्यक्ष जाऊन तसेच संकेतस्थळांवर भेट देऊन प्रवेशाची माहिती जाणून घेताना दिसत आहेत. दरम्यान, मूल्यमापन पद्धतीमुळे यावर्षी दहावीच्या निकालाचा टक्का मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. अनेक विद्यार्थ्यांनी ९० पेक्षा अधिक टक्केवारी मिळवली आहे. त्यामुळे, अकरावी प्रवेशासाठी विज्ञान शाखेकडे विद्यार्थ्यांचा अधिक कल दिसून येत आहे. त्याखालोखाल वाणिज्य शाखेला विद्यार्थ्यांची पसंती असल्याचे चित्र आहे.

२७ ऑगस्टला जाहीर होणार पहिली यादी

अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेबाबत माहिती देताना माध्यमिक शिक्षणाधिकारी बी.जे. पाटील यांनी सांगितले की, अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना २४ ऑगस्टपर्यंत अर्ज करता येतील. त्यानंतर २७ ऑगस्टला पहिली गुणवत्ता यादी जाहीर होईल. विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश देताना 'मागेल त्याला शिक्षण' यानुसार प्राधान्य असेल. विज्ञान विषयात किमान ३५ टक्के गुण असणारा विद्यार्थी हा विज्ञान शाखेत पात्र असणार आहे. तर, एटीकेटीसाठी प्रवेश देताना शासन निर्णयांचे अनुपालन करण्यात येईल. अनुदानित-विनाअनुदानित तुकड्यांमध्ये प्रवेश देताना विद्यालयाच्या शिक्षक-पालक संघामध्ये ठरवून दिलेली फी आकारण्याच्या शासनाच्या सूचना आहेत, असेही शिक्षणाधिकारी पाटील यांनी सांगितले.

महाविद्यालयांच्या आकडेवारीवर एक नजर

जिल्ह्यातील एकूण महाविद्यालये - २१८

अनुदानित महाविद्यालये - १४५
विना अनुदानित महाविद्यालये - ५०
स्वयं अर्थसहाय्यित महाविद्यालये - 23

अशा आहेत शाखानिहाय जागा -

कला शाखा- २४,३२०
विज्ञान शाखा- १७,२००
वाणिज्य शाखा- ५,३६०
इतर - २,२००

हेही वाचा -स्पेशल रिपोर्ट : एकनाथ खडसेंची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घुसमट? वाचा सविस्तर...

ABOUT THE AUTHOR

...view details