जळगाव- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या वतीने आज ठाकरे सरकारच्या विरोधात राज्यव्यापी 'महाराष्ट्र बचाव आंदोलना'ची हाक देण्यात आली आहे. या आंदोलनात भाजपचे सर्वच नेते, पदाधिकारी तसेच कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. जळगाव जिल्ह्यात मात्र, भाजपच्या या आंदोलनापेक्षा एकनाथ खडसे यांची चर्चा आहे. त्याला कारणही तसेच आहे. सोशल मीडियावर एकनाथ खडसेंच्या हाती 'फडणवीस हटाओ, महाराष्ट्र बचाओ' असा मजकूर असलेल्या बॅनरचा फोटो जोरदार व्हायरल झाला आहे.
विधानपरिषद निवडणुकीत संधी न मिळाल्याने सध्या खडसे भाजपच्या पक्षश्रेष्ठींवर नाराज आहेत. त्यामुळे खडसेंनी खरोखर अशी भूमिका घेतली की काय? याची चर्चा आहे. परंतु, हा फोटो कुणीतरी एडिटिंग करून व्हायरल केल्याचे स्पष्टीकरण खडसेंनी स्वतः 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिले.
महाविकास आघाडीविरोधात घोषणाबाजी-
एकीकडे भाजपच्या नेत्यांनी ठाकरे सरकारविरोधात एल्गार पुकारला असताना, तिकडे नाराज नेते एकनाथ खडसे नेमकी काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचं लक्ष लागले होते. खडसे भाजपच्या आंदोलनात उतरणार की नाही, याची उत्सुकता होती. अखेर एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगरात आपल्या घरासमोर अंगणात उतरुन, महाविकास आघाडी सरकारविरोधात घोषणाबाजी केली.